मुंबई : युद्ध जन्य परिस्थितीत आपत्तीचा सामना करण्यासाठी जिल्हा स्तरावर २२ कोटी ५० लाखांचा निधी उपलब्ध केला आहे. मुंबई ठाणे पुणे नाशिक रत्नागिरी सिंधुदुर्ग आदी संवेदनशील विभागाला अधिकचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे.
भारत - पाक संघर्षाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देश अलर्ट मोड वर आहे. दहशतवादी हल्ल्याचा धोका लक्षात घेता दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सुरक्षेचा आढावा घेत सुरक्षेसंबंधी योग्य ती दक्षता घेण्याचे आदेश दिले आहेत. तसेच आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी जिल्हा स्तरावर कुठलीही मदत हवी असल्यास राज्य सरकार पाठिशी आहे. आपत्ती व्यवस्थापनासाठी लागणारे साहित्य आदी खरेदीसाठी तातडीने निधी उपलब्ध करुन देण्याचे जाहीर केले होते. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने जिल्हा स्तरावर निधी उपलब्ध करुन दिला आहे.
आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ च्या तरतूदीनुसार मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची स्थापना करण्यात आलेली आहे. आपत्ती प्रसंगी प्रतिसाद देणाऱ्या यंत्रणांचे सक्षमीकरण करणे ही प्राधिकरणाची मुख्य जबाबदारी आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करत आपत्ती व्यवस्थापनांतर्गत आपत्तीमुळे निर्माण होणारे धोके व नुकसान कमी करण्यासाठी उचित प्रतिबंधात्मक उपाययोजना, सौम्यीकरण उपाय, पूर्वतयारी व क्षमता बांधणी, प्रशिक्षण व जनजागृती, शोध व बचाव कार्य, आपत्ती व्यवस्थापना संबंधित कामे करण्यात येणार आहे. यासाठी जिल्हा स्तरावर निधी उपलब्ध करण्यात आला आहे.