मुंबई

घरबसल्या मिळणार महिला बचत गटांची उत्पादने; ॲॅपवर ऑर्डर करा, घरपोच डिलिव्हरी

महिला बचत गटांनी तयार केलेली उत्पादने ऑर्डर करताच डबेवाल्यांच्या माध्यमातून घरपोच मिळणार आहेत.

Swapnil S

मुंबई : महिला बचत गटांनी तयार केलेली उत्पादने ऑर्डर करताच डबेवाल्यांच्या माध्यमातून घरपोच मिळणार आहेत. महिला बचत गटांनी तयार केलेल्या उत्पादनांना बाजारपेठ मिळण्यासाठी व उत्पादनांच्या मार्केटिंग आणि ब्रँडिंगसाठी मुंबई महापालिका व एसएनडीटीने मोबाईल ॲप विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पालिकेच्या या निर्णयामुळे महिला बचत गटांना उत्पादन विक्रीसाठी हक्काचे व्यासपीठ मिळणार आहे.

मुंबईतील महिला बचत गटांच्या उत्पादनांना ऑनलाईन बाजारपेठ मिळण्यासाठी ॲॅपच्या माध्यमातून यंत्रणा विकसित करण्याचे निर्देश अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांनी दिले आहेत. या ॲपमध्ये समाविष्ट असणाऱ्या उत्पादनांसाठी एक विशिष्ट गुणवत्ता परीक्षण, दळणवळण व्यवस्था आदी सगळ्या निकषांची पूर्तता करणाऱ्या उत्पादनांचा समावेश असावा. तसेच उत्पादनांचे चांगले ब्रॅँडिंग आणि मार्केटिंग व्हावे आदी सूचना डॉ. शिंदे यांनी दिल्या आहेत.

उत्पादने घरोघरी पोहचवण्यासाठी मुंबईतील डबेवाल्यांची यंत्रणा सोबत घ्यावी, तसेच अधिक सक्षम नेटवर्क वापरण्याची गरजही त्यांनी बोलून दाखवली. डॉ. सुधाकर शिंदे यांची मुंबई डबेवाला संघटनेच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी भेट घेतली. यावेळी ‘वातावरण’ संस्थेचे प्रतिनिधीही उपस्थित होते. महिला बचत गटांची उत्पादने संपूर्ण मुंबईत पोहचवण्यासाठी डबेवाला संघटनेने संमती दिली आहे.

मुंबईतील सुमारे दहा हजार महिला बचत गटांसोबत एक लाखाहून अधिक महिला विविध प्रकारच्या वस्तू आणि उत्पादने तयार करत आहेत. त्यात खाद्यपदार्थांपासून ते महिलांनी स्वतः तयार केलेल्या वस्तूंचा समावेश आहे. या उत्पादनांना चांगली बाजारपेठ मिळण्यासाठी मनपाचा नियोजन विभाग ॲॅप विकासाचे काम करत आहे. तसेच या कामासाठी पालिकेने एस.एन.डी.टी. विद्यापीठासोबत सामंजस्य करारही केला आहे. या सर्व प्रयत्नांतून महिला बचत गट तसेच मुंबई डबेवाला संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने ही उत्पादने घरोघरी पोहचवण्याचा उद्देश असल्याची माहिती पालिकेच्या संचालक (नियोजन) डॉ. प्राची जांभेकर यांनी दिली.

असे असेल ॲॅप!

या ॲॅपमध्ये उत्पादने तयार करतानाची महिलांची छायाचित्रे आणि व्हिडीओ याचा समावेश असेल. तसेच अत्यंत प्रभावीपणे ही उत्पादने घरोघरी पोहचतील यासाठी ॲॅपमध्ये विशिष्ट वैशिष्ट्ये समाविष्ट करण्यात येतील. त्यासोबतच महिला बचत गटांच्या उत्पादनाचे चांगले ब्रॅँडिंगही उपलब्ध करून देण्यात येणार आहे. बचत गट उत्पादनांना घरोघरी पोहचवण्यासाठी डबेवाल्यांची यंत्रणा वापरण्यात येणार आहे. त्या अनुषंगानेच ॲप विकसित करण्याची प्रक्रिया सुरू झाली असल्याचेही डॉ. जांभेकर यांनी नमूद केले.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी