महिलेची ओढणी खेचणे हा विनयभंगाचाच गुन्हा; बोरिवली अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयाचा निकाल 
मुंबई

महिलेची ओढणी खेचणे हा विनयभंगाचाच गुन्हा; बोरिवली अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयाचा निकाल

महिलेला पाहून शिट्टी वाजवणे, महिलेची ओढणी खेचणे हा विनयभंगाचाच गुन्हा आहे. अशा कृत्यामुळे महिलेच्या प्रतिष्ठेला धक्का बसतो, असे महत्त्वपूर्ण निरीक्षण बोरिवली येथील अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयाने नोंदवले.

Swapnil S

मुंबई : महिलेला पाहून शिट्टी वाजवणे, महिलेची ओढणी खेचणे हा विनयभंगाचाच गुन्हा आहे. अशा कृत्यामुळे महिलेच्या प्रतिष्ठेला धक्का बसतो, असे महत्त्वपूर्ण निरीक्षण बोरिवली येथील अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयाने नोंदवले. याचवेळी १२ वर्षांपूर्वीच्या विनयभंगाच्या प्रकरणात आरोपीला सहा महिन्यांचा साधा तुरुंगवास आणि एक हजार रुपयांचा दंड ठोठावला.

एप्रिल २०१३ मध्ये कांदिवली पश्चिमेकडील चारकोप परिसरात एका हातगाडीचालक महिलेशी वादावादीची घटना घडली होती. त्यादरम्यान आरोपी प्रशांत गायकवाड याने महिलेची ओढणी खेचली होती. तसेच महिलेला पाहून शिट्टी मारली होती. चारकोप येथील भगवती हॉस्पिटलसमोरील फुटपाथसमोर ही घटना घडली होती. आशा पाटील (नाव बदललेले) ही महिला चारकोप परिसरात पाणीपुरीची हातगाडी चालवत होती. एका राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्या महिलेने तिला पाणीपुरीचा व्यवसाय सुरू करण्यास मदत केली होती. २२ एप्रिल २०१३ रोजी आशा हिने तिची हातगाडी रस्त्याशेजारी उभी करुन ठेवली होती. त्यादरम्यान आरोपी प्रशांत गायकवाडने बहिणीला सोबत घेऊन आशाच्या हातगाडीचे नुकसान केले होते. याची माहिती मिळताच आशा घटनास्थळी धावत गेली आणि तिने आरोपीला हातगाडीचे नुकसान केल्याच्या कृत्याबद्दल जाब विचारला. त्यावर आरोपी प्रशांतने आशा हिच्याशी भांडण सुरू केले. तसेच तिची ओढणी ओढून विनयभंग केला.

याप्रकरणी प्रशांतविरुद्ध चारकोप पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेच्या खटल्यात सरकारी पक्ष आरोपी प्रशांत गायकवाडविरोधात विनयभंगाचा गुन्हा सिद्ध करण्यास यशस्वी झाला आहे, असे निरीक्षण अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी बी. एन. चिकने यांनी नोंदवले आणि आरोपीला सहा महिन्यांची शिक्षा ठोठावली.

मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरण : गँगस्टर अबू सालेमच्या मुदतपूर्व सुटकेची याचिका फेटाळली; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

Mumbai : राडारोडा वाहतूक करणाऱ्या वाहनांना नोंदणी अनिवार्य; २३ सप्टेंबरपर्यंत नोंदणीची मुदत

Thane : लोकलमधून महिला प्रवासी खाली पडली; दिवा-मुंब्रा वळणावरील Video व्हायरल

AI 80s Photo Trend : राजकीय नेत्यांनाही एआय ट्रेंडची भुरळ; १९८० च्या दशकातील रेट्रो लूक सोशल मीडियावर व्हायरल

ठाणे कोस्टल रोड-१च्या कामाला वेग; १४ महिन्यांत ४० टक्के काम पूर्ण