मुंबई : मुंबई महापालिकेने हाती घेतलेल्या रस्ते प्रकल्पांच्या कामांना आता वेग येणार असून ही कामे सुरू असतानाच भारतीय तंत्रज्ञान संस्थेकडून (आयआयटी) गुणवत्तेची तपासणी केली जाणार आहे. गुणवत्ता राखण्याच्या कामात सुलभता यावी, यासाठी महापालिकेने समन्वय अधिकाऱ्यांची नियुक्तीही केली आहे.
महापालिका प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, आयआयटी मुंबई आणि रस्ते विभाग यांच्यातील समन्वयासाठी समन्वय (नोडल) अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या माध्यमातून दैनंदिन संवाद साधत कामाची गुणवत्ता राखण्यासाठी दक्षता बाळगली जाईल.
मुंबई महानगरातील विविध रस्त्यांची सिमेंट काँक्रिटीकरण कामे प्रगतीपथावर आहेत. पावसाचा परतीचा प्रवास सुरू झाल्याचे भारतीय हवामान खात्याने जाहीर केले आहे. त्यामुळे, १ ऑक्टोबरपासून रस्ते विकास कामांना वेग द्यावा, असा निर्देश देण्यात आले आहेत.
सिमेंट काँक्रिटीकरण कामाचा दर्जा, गुणवत्ता चांगली राहावी यासाठी मुंबईतील भारतीय तंत्रज्ञान संस्थेची त्रयस्थ संस्था म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. रस्ते विकासाची कामे प्रत्यक्ष सुरू असताना या संस्थेने गुणवत्ता तपासणीचे काम करावे, असे स्पष्ट निर्देश महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी दिले आहेत.
महानगरपालिका हद्दीतील सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्याच्या उद्देशाने पहिल्या टप्प्यात ३९२ किलोमीटर, तर दुसऱ्या टप्प्यात ३०९ किलोमीटर अशा एकूण ७०१ किलोमीटर रस्त्यांच्या काँक्रिटीकरणासाठी कार्यादेश जारी करण्यात आला आहे. यामध्ये शहर विभाग, पश्चिम उपनगरे आणि पूर्व उपनगरातील कामांचा समावेश आहे. दुसऱ्या टप्प्यातील पाच पॅकेज (शहर विभाग १, पूर्व
विभाग १ आणि पश्चिम विभाग ३) आणि पहिल्या टप्प्यातील एका पॅकेजच्या कामांची गुणवत्ता तपासणी आणि अनुषंगिक कामे भारतीय तंत्रज्ञान संस्थेमार्फत केली जाणार आहेत.
आयआयटीवर जबाबदारी
अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर म्हणाले की, रस्ते विकासाची अंमलबजावणी करताना जाणीवपूर्वक कमी गुणवत्तेचे कामकाज होऊ नये म्हणून दक्षता घेणे, याबरोबरच कामाची अंमलबजावणी करताना चुका टाळण्यासाठी मार्गदर्शन आणि अत्युच्च गुणवत्तेची काळजी घेणे, या सर्व बाबींमध्ये भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) मार्गदर्शन करेल. रस्त्यांच्या देखभाल, पुनर्रचना व पुनर्वसनासाठी योग्य पद्धती निश्चित करण्याकामी आवश्यक सल्ला देणे, प्रत्येक प्रकरणाच्या आधारे आवश्यकतेनुसार तपासणी करणे, गुणवत्ता तपासणीचे निकष प्रत्येक प्रकरणाच्या आवश्यकतेनुसार तपासणे, गुणवत्ता राखण्यासाठी चाचण्या घेणे आणि गुणवत्ता नियंत्रण चाचणी अहवालांची तपासणी करणे, तांत्रिक लेखापरीक्षण अहवाल तयार करणे, गुणवत्तेची खात्री करण्यासाठी नियमितपणे प्रकल्पस्थळास भेटी देणे इत्यादी बाबींचा समावेश भारतीय तंत्रज्ञान संस्थेच्या कामकाजाच्या व्याप्तीत करण्यात आला आहे.