पावसाळ्याच्या दिवसात रेल्वेसेवा विस्कळीत होण्याच्या घटना सर्रास घडतात. परिणामी, प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतो. ही बाब लक्षात घेत महापालिका आणि रेल्वे प्रशासनाने युद्धपातळीवर रेल्वेच्या हद्दीत नालेसफाई, मोऱ्यांची (कल्व्हर्ट) सफाई हाती घेतली आहे. यामध्ये मध्य आणि हार्बर मार्गावर पावसाचे पाणी साचू नये, म्हणून सुमारे २८ ठिकाणी साचणाऱ्या पावसाच्या पाण्याचा उपसा करणारे पंप बसविण्यात येत आहेत.
मागील अनेक दिवसांपासून मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावर मान्सूनपूर्व कामे प्रशासनाकडून सुरू करण्यात आली आहेत. रेल्वे हद्दीतील व त्यालगतच्या वेगवेगळ्या नाल्यांमधील गाळ उपसण्यासह मोऱ्यांच्या स्वच्छतेची कामे, विविध ठिकाणी पावसाळी पाण्याचा उपसा करण्यासाठी पंप बसविणे, आवश्यक तेथे वृक्षछाटणी करणे आदी कामे करण्यात येत आहेत.
पावसाळापूर्व कामांचा आढावा घेण्यासाठी पालिका मुख्यालयात मंगळवारी रेल्वे अधिकाऱ्यांसोबत संयुक्त बैठक घेण्यात आली. या बैठकीला पर्जन्य जलवाहिन्या विभागाचे अधिकारी, रेल्वेचे अधिकारी व समन्वय अधिकारी उपस्थित होते. यामध्ये ही कामे तत्काळ म्हणजेच ३० मेपूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत.
दरम्यान, शीव ते कुर्ला स्थानकादरम्यानच्या परिसरातील पावसाचे पाणी मिठी नदीला येऊन मिळते. त्यादृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या लाल बहादूर शास्त्री मार्गालगत नाल्यांमधून गाळ काढण्याची कामे करताना काही ठिकाणी संयंत्रांद्वारे पोहोचणे शक्य होत नाही. या समस्येवर उपाय म्हणून महापालिकेने रेल्वे प्रशासनासोबत सिल्ट पुशर या आधुनिक संयंत्राचा वापर करून गाळ काढण्याचे काम सुरू केले आहे.
मध्य, हार्बर मार्गावर सर्वाधिक पंप
रेल्वे मार्गावर पाण्याचा उपसा करणारे पंप २८ ठिकाणी बसविण्यात येणार आहेत. यापैकी मध्य रेल्वे व हार्बर मार्गावरीस १८ ठिकाणी, तर पश्चिम रेल्वे मार्गावरील १० ठिकाणी पंप बसविण्यात येणार आहेत. पश्चिम रेल्वे मार्गावर प्रभादेवी ते दादर दरम्यान, प्रत्येकी तीन हजार घन मीटर प्रतितास उपसा क्षमता असलेले दोन पंप बसविण्यात येणार आहेत. याव्यतिरिक्त दादर ते माटुंगा रोडदरम्यान सहा ठिकाणी, तर वांद्रे टर्मिनस स्थानकालगत तीन ठिकाणी पंप बसविण्यात येणार आहेत. मध्य रेल्वे मार्गावर मस्जिद स्थानक, भायखळा, चिंचपोकळी, परळ, शीव (सायन), घाटकोपर, विद्याविहार, विक्रोळी, भांडुप, नाहूर आणि हार्बर मार्गावर शिवडी, वडाळा, टिळक नगर या रेल्वे स्थानकांलगत वेगवेगळ्या क्षमतेचे पंप बसविण्यात येणार आहेत.