राणीबागेत लवकरच सिंह गर्जना घुमणार; महापौर गुजरातच्या सक्करबाग प्राणीसंग्रहालयाची पाहणी करणार 
मुंबई

Mumbai : राणीबागेत लवकरच सिंह गर्जना घुमणार; महापौर गुजरातच्या सक्करबाग प्राणीसंग्रहालयाची पाहणी करणार

राणी बागेत सिंहांची डरकाळी पुन्हा घुमण्याची चाहत्यांची प्रतीक्षा आता संपण्याच्या मार्गावर आहे. यासाठी महापौर रितू तावडे लवकरच गुजरात दौऱ्यावर जाऊन मुख्यमंत्री आणि वनमंत्र्यांची भेट घेणार आहेत. सक्करबाग प्राणीसंग्रहालयाची पाहणीही त्या करणार आहेत.

गिरीश चित्रे

मुंबई : राणी बागेत सिंहांची डरकाळी कधी कानी पडणार चार वर्षांपासूनची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. गुजरातच्या जुनागड प्राणीसंग्रहालयातील सिंहांची जोडी मुंबईला मिळावी, यासाठी मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र सिंह यांना २६ मार्चला पत्र लिहिले. त्यानंतर हवा तसा प्रतिसाद मिळत नसल्याने स्वतः लवकरच गुजरातला जाणार असून गुजरातचे मुख्यमंत्री व वनमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे महापौर रितू तावडे यांनी सांगितले तसेच सक्करबाग प्राणीसंग्रहालयाची पहाणी करणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

दक्षिण मुंबईतील भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणीसंग्रहालय पर्यटकांचे आकर्षणाचे केंद्र आहे. या संग्रहालयात २१ पेंग्विन, वाघ, शेकडो प्रकारचे पक्षी, हत्ती, हरणे, माकडे, तरस, अजगर आदी प्रकारचे १३ जातीचे ८४ सस्तन प्राणी, १९ जातींचे १५७ पक्षी आहेत. या शिवाय २५६ प्रजातींचे आणि ६६११ वृक्ष-वनस्पती आहेत तर करकोचा, छत्रबलाक, बगळे, सारस असे पाणथळ पक्षी आहेत. मे महिन्यात गुजरातला जाणार असून तेथील मुख्यमंत्री व वनमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे महापौरांनी सांगितले.

जिमीचा २०१४ साली मृत्यू

राणी बागेत जिमी ही शेवटची सिंहीण होती. तिचा २०१४ मध्ये मृत्यू झाला. त्यानंतर सिंह आणण्यासाठी प्रयत्न झाले नाही. मात्र, गेल्या चार वर्षापासून हे प्रयत्न सुरू झाले. यासाठी देशभरातील प्राणीसंग्रहालयाशीही अधिकाऱ्यांनी चर्चा केली. मात्र त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाले नाही.

झेब्रा नाही पण पशुपक्षी देऊ

सक्करबाग प्राणीसंग्रहालयाने सिंहांची जोडी देण्यासंदर्भात सकारात्मक भूमिका घेतली आहे. मात्र, सक्करबाग प्राणीसंग्रहालयाने राणी बाग प्राणीसंग्रहालयाकडे झेब्रा मिळावा, अशी मागणी केली आहे. मात्र, झेब्रा देणे शक्य होत नसल्याने राणी बागेत देशी विदेशी पशुपक्षी असून ते देण्याची तयारी राणी बाग प्राणीसंग्रहालयाने दर्शवली आहे, असे महापौर रितू तावडे यांनी सांगितले.

Mumbai : वांद्रे-सी लिंक ते गोरेगाव आता सुसाट; ५० मिनिटांचा प्रवास १५ मिनिटांत, उन्नत मार्ग दीड वर्षांत पूर्ण होणार

Mumbai : ठाकरे बंधूंचा आज गर्जना मोर्चा

मल्ल्याचे ८७५१ कोटी कर्ज फेडणे बाकी; SBI चे उच्च न्यायालयात स्पष्टीकरण

MPSC आंदोलनात फूट? पुण्यात तीन ठिकाणी विद्यार्थ्यांची आंदोलने, विद्यार्थ्यांमध्येही मतभेद

डेव्हिड हेडलीची साक्ष भारतासाठी ठरली 'मास्टरस्ट्रोक'; उज्ज्वल निकम यांचा गौप्यस्फोट