Mumbai : पर्यटकांसाठी असलेली वाहने धूळखात पडून; राणी बागेतील पर्यटकांना वाहनांची प्रतीक्षाच  
मुंबई

Mumbai : पर्यटकांसाठी असलेली वाहने धूळखात पडून; राणी बागेतील पर्यटकांना वाहनांची प्रतीक्षाच

राणी बागेत येणाऱ्या पर्यटकांसाठी विशेष करून ज्येष्ठ व गरोदर महिला पर्यटकांसाठी बॅटरीवर धावणारी ८ आसनी वाहने दोन वर्षांपूर्वी आणून ठेवली.

Swapnil S

मुंबई : राणी बागेत येणाऱ्या पर्यटकांसाठी विशेष करून ज्येष्ठ व गरोदर महिला पर्यटकांसाठी बॅटरीवर धावणारी ८ आसनी वाहने दोन वर्षांपूर्वी आणून ठेवली. मात्र दोन वर्षे उलटली तरी पर्यटकांना या वाहनांतून सफर करता आलेली नाही. तर बच्चेकंपनीलाही इलेक्ट्रिक दुमजली बसची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालयात दररोज ७ ते ८ हजार पर्यटक येतात. सुट्टीच्या दिवशी तर पर्यटकांचा आकडा २० ते २५ हजारांच्या घरात पोहोचतो. राणी बागेत येणाऱ्या पर्यटकांचे आकर्षण ठरते ते पेंग्विन. त्यामुळे बच्चेकंपनीसह देशविदेशातील पर्यटक राणी बागेत पशुपक्ष्यांच्या धमाल मस्तीचा अनुभव लुटतात. मात्र राणी बागेत गरोदर महिला, ज्येष्ठ नागरिक, चालण्यास अडचण असणारेही पर्यटक भेट देतात. बच्चेकंपनी, वृद्ध आणि दिव्यांग व्यक्ती यांना देखील उद्यानाचा संपूर्ण परिसर पाहून आनंद लुटता यावा, यासाठी बॅटरीवर धावणाऱ्या वाहनांची व्यवस्था करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेच्या राणी बाग प्राणिसंग्रहालय प्रशासनाने घेतला.

बॅटरीवर धावणाऱ्या आठ आसनी चार वाहनांची व्यवस्था करताना २०२३ च्या जुलैच्या मध्यापर्यंत ही वाहने पर्यटकांच्या सेवेत येणार होती. मात्र त्याला विविध कारणास्तव विलंब झाला. चारही वाहने उद्यान सुरू असणाऱ्या वेळेत म्हणजे सकाळी ९.३० ते सायंकाळी ६ या वेळेत ३ ते १२ वर्षांपर्यंतची मुले यांच्यासह वृद्धांकरिता देखील उपलब्ध केली जाणार होती. मात्र दोन वर्षे उलटली तरी आजही ही आठ आसनी वाहने धूळखात पडून आहेत.

ओपन डबलडेकर बसला विलंबच

लंडनची बस अशी ओळख असलेली लहान मुलांसाठी उपयुक्त १० ते १२ मुले बसतील, अशी दुमजली बस वर्षभरापूर्वी राणी बागेत दाखल झाली. बॅटरी ऑपरेटेड बस असल्याने कोणत्याही प्रकारचे प्रदूषण होणार नाही. प्रायोगिक तत्त्वावर एक बस बच्चेकंपनीसाठी गेल्या वर्षी पावसाळ्याआधीच सुरू करण्याचे नियोजन होते. मात्र काही तांत्रिक कारणास्तव ती सेवा सुरू होऊ शकली नाही. यंदाच्या पावसाळ्याआधी बच्चे कंपनीसाठी बस सुरू करण्याचा प्रयत्न आहे, असे प्राणिसंग्रहालयातील एक संचालक डॉ. संजय त्रिपाठी यांनी सांगितले.

शिवाजी पार्कवर विनापरवानगी आंदोलन; ५०० जणांवर गुन्हे, दीपकेंसह आयोजकांचा समावेश

'मविआ'त नाराजीनाट्य; काँग्रेसने विधान परिषद उमेदवारी जाहीर केल्याने आघाडीत बिघाडी; नेत्यांमध्ये आज पुन्हा चर्चा

जंतरमंतरवर १५० आंदोलक ताब्यात; नेहा बोरा, योगेंद्र यादव, प्रशांत भूषण यांचा समावेश

तीन वर्षांतच खटल्यांचा निकाल; गृहमंत्री अमित शहा यांची घोषणा; BNS ची पूर्ण अंमलबजावणी गरजेची

Asian Games 2026 : सुवर्ण वर्षाव सुरूच; आशियाई स्पर्धेत भारताची दमदार कामगिरी