मुंबई : अंधेरी जोगेश्वरी परिसर दरवर्षी पावसाळ्यात जलमय होतो. परंतु आता अंधेरी पश्चिम येथील इरला नाल्याचे पुनर्बांधकाम करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. यामुळे नाल्याची रुंदीकरण होईल आणि पावसाळ्यात पाणी वेगाने वाहून जाईल. त्यामुळे २०२५ च्या पावसाळ्यात अंधेरी जोगेश्वरीकरांना पूरस्थितीचा दिलासा मिळणार आहे. यासाठी मुंबई महापालिका १० कोटी ३१ लाख ९७ हजार ५६० रुपये खर्चणार आहे.
मुंबईतील नालेसफाईसाठी दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च करूनही पावसाळ्यात पाणी तुंबण्याचे प्रकार घडतात. काही ठिकाणी नागरिकांना पूरस्थितीला सामोरे जावे लागते. अंधेरी, विलेपार्ले परिसरातील मोरा गाव आणि इरला पंपिंग स्टेशनला जोडणारा जंक्शनजवळील ब्रिज ओव्हर इरला नाला मोठा नाला आहे. आजूबाजूला वसलेल्या वसाहतीतील नागरिक नाल्यात कचरा फेकत असल्याने नाला कच-याने तुंबतो. पावसापूर्वी या नाल्यातील कचरा समाधानकारक साफ न झाल्यास पाण्याचा निचरा होत नाही. कचरा साफ करण्यासाठी पालिकेकडून कोट्यवधी रुपये खर्च करूनही नाला तुंबत असल्याने नागरिकांना पूरस्थितीला सामोरे जावे जावे लागते.