मुंबई

रिक्षा २ रुपये तर टॅक्सीचे भाडे ३ रुपयांनी वाढले ; संपाची भूमिका कायम

१३ सप्टेंबर रोजी मंत्री उदय सामंत यांच्यासोबत झालेली बैठीकी देखील निष्फळ ठरल्याने टॅक्सी युनियनकडून २६ सप्टेंबरपासून बेमुदत संप जाहीर केला

देवांग भागवत

मागील ६ महिन्यांपासून भाडेवाढीबाबत मुंबईसह सर्व शहरातील रिक्षा - टॅक्सी चालकांचा सुरू असलेला संघर्ष तूर्तास थांबला आहे. नुकतेच राज्य सरकारने शहरातील रिक्षा - टॅक्सीच्या भाडेवाढीबाबत सकारात्मक निर्णय घेतला आहे. यामध्ये रिक्षाच्या भाडे दरात २ रुपयांनी तर टॅक्सीच्या भाडेदरात ३ रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. या निर्णयामुळे रिक्षा - टॅक्सी चालकांना काहीसा दिलासा मिळणार आहे. तर दुसऱ्या बाजूला झालेली भाडेवाढ मान्य नसल्याचे सांगत रिक्षा टॅक्सी संघटनांनी २६ सप्टेंबरला होणाऱ्या संपाच्या निर्णयावर आम्ही ठाम असल्याचे सांगितले. यामुळे सरकार आणि रिक्षा टॅक्सी संघटना संघर्ष थांबणार की वाढणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

सीएनजीच्या दरात झालेली वाढ आणि त्यामुळे निर्माण होणारी आर्थिक समस्या यामुळे मुंबईत टॅक्सीच्या किमान भाड्यात १० रुपयांनी वाढ करण्याची मागणी गेल्या ६ महिन्यांपासून टॅक्सी युनियनकडून करण्यात येत होती. सध्या मुंबईत टॅक्सीचे किमान भाडे २५ रुपये एवढे आहे. मात्र वाढत्या सीएनजी दरामुळे हे भाडे कमी असल्याने त्यात वाढ करावी अशी मागणी जोर धरत होती. याबाबत निवेदने, संप पुकारत टॅक्सी चालक संघटना वेळोवेळी आक्रमक झाल्या. १५ सप्टेंबरपासून रिक्षा टॅक्सी युनियनकडून बेमुदत संप पुकारण्यात आला होता. मात्र चर्चेचे आश्वासन दिल्याने हा संप संघटनांकडून तूर्तास मागे घेण्यात आला. परंतु १३ सप्टेंबर रोजी मंत्री उदय सामंत यांच्यासोबत झालेली बैठीकी देखील निष्फळ ठरल्याने टॅक्सी युनियनकडून २६ सप्टेंबरपासून बेमुदत संप जाहीर केला. मात्र तत्पूर्वी शासनाने सर्व रिक्षा - टॅक्सी चालकांना दिलासा दिला आहे. रिक्षाच्या भाडे दरात २ रुपयांनी तर टॅक्सीच्या भाडेदरात ३ रुपयांनी वाढ करणार असल्याचे जाहीर केले आहे.

या भाडे वाढीने शासनाने आमच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम केले आहे. आम्ही १० रुपये एवढी भाडे मागितली असताना केवळ ३ रुपये भाडेवाढ देण्यात आली आहे. या निर्णयामुळे आम्ही असमाधानी आहोत. संपाची भूमिका आमची कायम राहील.

- ए. एल. क्वाड्रोस, नेते, मुंबई टॅक्सीमेन्स युनियन

मुंबईसह २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांची घोषणा; आजपासून आचारसंहिता लागू

BMC Election : २२७ जागांसाठी मुंबईत मतदान; महापालिका निवडणुकांची अधिसूचना जाहीर

'नाव बदलणे ही लाजिरवाणी गोष्ट...'; ‘विकसित भारत’च्या नावाखाली MGNREGA च्या नावात बदल केल्याने विरोधक आक्रमक

कल्याणमध्ये रॅपिडो चालकाचा धक्कादायक प्रकार; विनयभंगाच्या प्रकरणानंतर रॅपिडो, ओला आणि उबरवर टांगती तलवार

‘वोट चोर, गद्दी छोड़’ रॅलीवरून संसदेत गोंधळ; दोन्ही सभागृहांचे कामकाज तहकूब, भाजपचा तीव्र आक्षेप