रितू तावडे मुंबईच्या महापौरपदी विराजमान; संजय घाडी यांनी उपमहापौरपदाची सूत्रे स्वीकारली Photo : PTI
मुंबई

BMC Mayor : रितू तावडे मुंबईच्या महापौरपदी विराजमान; संजय घाडी यांनी उपमहापौरपदाची सूत्रे स्वीकारली

संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या मुंबई महापालिकेत अखेर भाजपच्या नगरसेविका रितू तावडे यांनी बुधवारी महापौरपदाची जबाबदारी स्वीकारली, तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नगरसेवक संजय घाडी यांनी उपमहापौरपदाची सूत्रे हाती घेतली.रितू तावडे या मुंबईच्या ८ व्या महिला महापौर म्हणून विराजमान झाल्या आहेत.

Swapnil S

मुंबई : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या मुंबई महापालिकेत अखेर भाजपच्या नगरसेविका रितू तावडे यांनी बुधवारी महापौरपदाची जबाबदारी स्वीकारली, तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नगरसेवक संजय घाडी यांनी उपमहापौरपदाची सूत्रे हाती घेतली.रितू तावडे या मुंबईच्या ८ व्या महिला महापौर म्हणून विराजमान झाल्या आहेत.

आशिया खंडातील श्रीमंत महापालिका असलेल्या मुंबई महापालिकेत भाजपच्या रितू तावडे या महापौर म्हणून विराजमान झाल्य, तर शिंदे यांच्या शिवसेनेचे संजय घाडी यांनी उपमहापौरपदाचा पदभार स्वीकारला. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. चार वर्षांनंतर मुंबई महापालिकेच्या सभागृहात सत्ताधारी व विरोधक एकत्र आले.

रितू तावडे यांनी महापौरपदाची शपथ घेतली. यावेळी सभागृहात पहिल्याच दिवशी जोरदार गदारोळ झाला. ‘चोर है.. चोर है’, ‘५० खोके एकदम ओके’ अशा घोषणा ठाकरे सेनेच्या नगरसेवकांनी सभागृहात दिल्या. तर भाजपच्या नगरसेवकांनी ‘जय श्रीराम’ आणि ‘मोदी-मोदी’च्या घोषणा देऊन पालिका सभागृह दणाणून सोडले. यावेळी पीठासीन अधिकारी भूषण गगराणी यांनी घोषणाबाजी करणाऱ्या सदस्यांना समज देत परवानगीशिवाय कोणी बोलू नये, असे आवाहन केले. तरी भाजप व शिंदे सेनेच्या नगरसेवकांकडून जोरदार घोषणाबाजी सुरूच होती.

मुंबई महापालिकेत भाजप आणि शिवसेना शिंदे गटाचा महापौर - उपमहापौर विराजमान होण्याआधी महायुतीच्या सर्व नगरसेवकांनी हुतात्मा चौक येथे जाऊन संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील हुतात्म्यांना आदरांजली वाहिली आणि त्यानंतर महायुतीचे सर्व नगरसेवक मुंबईत महानगरपालिकेत आले. पालिका सभागृहात महायुतीचे नगरसेवक आल्यानंतर जोरदार शंखनाद करण्यात आला. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महापालिकेत येताच भाजपचे सर्व नगरसेवक सभागृहात आले. यावेळी भाजपच्या नगरसेवकांनी ‘जय श्रीराम’ आणि ‘मोदी-मोदी’च्या घोषणा दिल्या. त्यानंतर त्या ठिकाणी आलेल्या ठाकरेंच्या नगरसेवकांनीसुद्धा घोषणाबाजी सुरू केली. महापालिकेच्या सभागृहात एकीकडे भाजपच्या नगरसेवकांकडून ‘मोदी.. मोदी..’च्या घोषणा सुरू असतानाच दुसरीकडे ठाकरेंच्या नगरसेवकांनी ‘चोर है.. चोर है..’च्या घोषणा दिल्या. यावेळी दोन्ही पक्षांच्या नगरसेवकांनी मोठा गोंधळ घातला. मात्र, गोंधळाच्या वातावरणातच पीठासीन अधिकारी गगराणी यांनी महापौर व उपमहापौर यांच्या नावाची घोषणा केली.

अस्सल मराठी चेहरा दिला - फडणवीस

रितू तावडे यांनी मुंबईकरांसाठी नेहमीच आक्रमकपणे काम केले. आता पालिकेच्या माध्यमातून काम लोकांपर्यंत पोहोचवले जाईल. महापौर कोण यावरुन विरोधकांनी अनेक आरोप-प्रत्यारोप केले. परंतु भाजपने महापौर दिला तो अस्सल मराठीच दिलाय, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरेंना टोला लगावला.

मुंबईकरांनी विकासाला स्वीकारले - एकनाथ शिंदे

वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त बाळासाहेबांची स्वप्नं पूर्ण करण्याबरोबर मुंबईला जागतिक दर्जाचे फिनटेक केंद्र बनवणार, अशी ग्वाही शिवसेना मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. मागील २५ वर्षे मुंबईकर विकासापासून वंचित होते, मात्र महायुतीचे सरकार आल्यानंतर मागील साडेतीन वर्षात मुंबईच्या विकासाला चालना मिळाली. महायुतीला कौल देऊन मुंबईकरांनी विकासाला स्वीकारले, असे ते म्हणाले. महायुतीच्या महापौर रितू तावडे आणि उपमहापौर संजय घाडी दोघेही अनुभवी आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईला जागतिक दर्जाचे ‘फिनटेक हब’ बनवण्याचे स्वप्न पाहिले आहे. या स्वप्नाच्या पूर्ततेसाठी जे-जे आवश्यक असेल ते-ते सर्व सरकार करेल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिली.

प्रेक्षक गॅलरीत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री

४४ वर्षांनंतर मुंबई महापालिकेत भाजपचा महापौर विराजमान झाला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रेक्षक गॅलरीतून या कार्यक्रमाचा आनंद घेतला.

ठाकरे सेनेच्या नगरसेवकांची घोषणाबाजी व सभात्याग

पीठासीन अधिकारी भूषण गगराणी यांनी महापौर व उपमहापौर या दोघांच्या नावाची घोषणा केली. माजी महापौरांच्या हस्ते नवनियुक्त महापौरांच्या नावाची घोषणा करणे अपेक्षित असताना पीठासीन अधिकारी भूषण गगराणी यांनी कुठल्या नियमाच्या आधारे महापौरांच्या नावाची घोषणा केली, असा मुद्दा उपस्थित करत ठाकरे गटाच्या नगरसेवकांनी ‘५० खोके एकदम ओके, ठाकरे ठाकरे एकच ठाकरे’ अशी घोषणाबाजी करत पालिका सभागृहाच्या कामकाजावर बहिष्कार टाकून सभात्याग केला. दरम्यान, भाजप नगरसेवकांनीही ठाकरे सेनेला प्रत्युत्तर देत ‘मोदी मोदी, देवाभाऊ देवाभाऊ’ अशी जोरदार घोषणाबाजी केली.

रत्नागिरी पॅसेंजर दादरहून नाहीच; पाचव्या-सहाव्या मार्गिकेनंतर दादरपासून गाडी चालविण्याचा विचार

गोदावरी महामंडळाच्या निधीत मोठी कपात; भूसंपादनासाठी ३०० कोटींचा निधी रखडला

घारापुरी बेटावर प्रगत जलव्यवस्थापनाचा उलगडा; पुरातत्त्व विभागाचे उत्खनन, जागतिक व्यापाराचे केंद्र असल्याचेही समोर

राजा रवी वर्मांचे चित्र १६७ कोटींना; सायरस पूनावाला यांनी केली खरेदी

लाचखोर ठेका अभियंत्याची बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी नियुक्ती; स्वराज अभियानचा आक्षेप, सेवेतूनच कमी करण्याची मागणी!