मुंबई

पार्किंगची समस्या दूर करण्यासाठी वरळीत अत्याधुनिक रोबो अँड शटल पार्किंग

Swapnil S

मुंबई : मुंबईतील पार्किंगची समस्या दूर करण्यासाठी भूमिगत व रोबो अँड शटल पार्किंगची सुविधा उपलब्ध करण्यात येत आहे. हिट डिटेक्टर, धुराचा इशारा देणाऱ्या यंत्रणेसह वरळीत स्वयंचलित अत्याधुनिक, बहुमजली व रोबो अँड शटल उभारण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. यासाठी मुंबई महापालिका तब्बल २१६ कोटी रुपये खर्च करणार आहे.

मुंबईतील पार्किंगची समस्या दूर करण्यासाठी महानगरपालिकेच्या माध्यमातून विविध उपाययोजना राबवण्यात येत आहेत. वरळी येथे पालिकेच्या अभियांत्रिकी संकूल (इंजिनीअरिंग हब) जवळ विद्युत यांत्रिकी पद्धतीने संचालित होवू शकणारे बहुमजली वाहनतळ उभारण्याचा निर्णय महानगरपालिका प्रशासनाने घेतला आहे. हे वाहनतळ आचार्य अत्रे चौकाजवळ असून, या परिसरात भूमिगत मेट्रो स्थानक, पालिकेचे अभियांत्रिकी संकूल (इंजिनीअरिंग हब) यासह अनेक खासगी व्यावसायिक इमारती आहेत. त्यामुळे याठिकाणी पार्किंगची सुविधा उपलब्ध करण्यात यावी, अशी मागणी मुंबई वाहनतळ प्राधिकरणाने केली आहे.

मुंबई अग्निशमन दलाच्या सद्यस्थितीतील मानकानुसार या वाहनतळ इमारतीमध्ये अग्नीशमन यंत्रणा उभारली जाणार आहे. यामध्ये प्रत्येक वाहनाच्या जागी उष्णता शोधक (हिट डिटेक्टर) आणि विमोचन शीर्ष (डाऊझर हेड) बसवण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक मजल्यावर मोठ्या आकाराच्या वाहिन्या, वीस हजार लीटर दाबाचे व्हेसल, पंप इत्यादी लावण्यात येणार आहे. त्यासाठी अतिरिक्त पाणीसाठा व्यवस्था, झडपा, केबलिंग पॅनल, नियंत्रित केबलिंग, धूर दिसताच तात्काळ इशारा देणारी यंत्रणा या सर्वांचा समावेश करणारी संयंत्रे आदी या वाहनतळामध्ये उभारली जाणार आहेत.

रोबो ऍण्ड शटलचे ४,२०० चौरस मीटरवर बांधकाम होणार असून, पावसाळ्यासह एकूण ४८ महिन्यात बांधकाम पूर्ण होणे अपेक्षित असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज मुंबईत रोड शो; महायुतीकडून जोरदार शक्तीप्रदर्शन, कल्याणमध्ये जाहीर सभा

ना घर, ना जमीन...पंतप्रधान मोदींकडे किती आहे संपत्ती?

मुंबई होर्डिंग घटनेतील आरोपीचं २३ गुन्हेगारी प्रकरणांमध्ये नाव, बलात्काराच्या आरोपाखाली झाली होती अटक

होर्डिंगवरून तू तू-मैं मैं; बेजबाबदारपणाचे १४ बळी राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू

शरद पवार, ठाकरे यांना सहानुभूती; वळसे पाटील यांचे वक्तव्य, भुजबळांचाही दुजोरा