मुंबई

Mumbai : ५ कोटींच्या खंडणीसाठी RTI कार्यकर्त्याची आंध्रच्या खासदाराला धमकी; पीएला चाकू दाखवत ७० हजारही लुटले, मुंबईतून अटक

माहितीच्या अधिकाराचा (RTI) गैरवापर करून आंध्र प्रदेशातील पश्चिम गोदावरी जिल्ह्यातील एका खासदाराकडून तब्बल ₹५ कोटींची खंडणी मागितल्याप्रकरणी एका आरटीआय कार्यकर्त्याला मुंबईतून अटक करण्यात आली आहे.

किशोरी घायवट-उबाळे

आंध्र प्रदेशच्या पश्चिम गोदावरी जिल्ह्यातील एका खासदाराला ब्लॅकमेल करून ५ कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. माहितीच्या अधिकाराचा (RTI) गैरवापर करून खासदाराकडून तब्बल ₹५ कोटींची खंडणी मागितल्याप्रकरणी एका आरटीआय कार्यकर्त्याला मुंबईतून अटक करण्यात आली आहे. आरोपीने खासदाराच्या स्वीय सहाय्यकाला (PA) चाकूचा धाक दाखवून ₹७० हजारांची लूट केल्याचाही गंभीर आरोप आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने स्वतःला आरटीआय कार्यकर्ता असल्याचे सांगत खासदाराविषयी मिळवलेली माहिती केंद्रीय तपास यंत्रणांकडे देण्याची धमकी दिली होती. खंडणी न दिल्यास गंभीर परिणाम होतील, अशी सतत धमकी दिल्याने खासदार कार्यालयात खळबळ उडाली होती.

पीएला चाकूचा धाक दाखवून लुटले

धमकीचे कॉल सुरू झाल्यानंतर खासदारांनी आपल्या स्वीय सहाय्यकाला आंध्र प्रदेशातील मेदुकूर परिसरात आरोपीशी चर्चा करण्यासाठी पाठवले. मात्र, भेटीदरम्यान आरोपीने अचानक चाकू काढून पीएला धमकावले आणि त्याच्याकडील ₹७० हजार रोख रक्कम जबरदस्तीने लुटली, असा आरोप आहे.

गंभीर कलमांतर्गत गुन्हा दाखल

या प्रकरणी खासदार कार्यालयाकडून तक्रार दाखल झाल्यानंतर मेदुकूर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत खंडणी, दरोडा आणि धमकीसंबंधी गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला. तपासात आरोपीचे नाव रुशांत जयकुमार वडके असे असल्याचे उघड झाले आहे.

मुंबईतून अटक

घटनेनंतर आरोपी मुंबईत लपल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार आंध्र प्रदेश पोलिसांचे पथक मुंबईत दाखल झाले आणि व्ही.पी. रोड पोलिसांच्या मदतीने आरोपीला अटक करण्यात आली.

पुढील तपास सुरू

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, आरोपीने आरटीआय अर्जांमधून मिळालेल्या माहितीचा वापर करून वारंवार ब्लॅकमेल केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणात आणखी कोणी सहभागी आहे का, याचा तपास सुरू असून पुढील कारवाई करण्यात येणार आहे.

या घटनेमुळे आरटीआयच्या गैरवापराचा गंभीर मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

उद्याची TET रद्द; पेपरफुटीच्या संशयावरून राज्य परीक्षा परिषदेचा मोठा निर्णय, भिवंडीत तिघांना अटक

फुकट प्रवासाला नकार दिल्याने रिक्षाचालकाला शिवीगाळ; व्हिडिओ व्हायरल होताच होमगार्डला कामावरून काढले

५२ वर्षांनंतर सलमान खान गॅलेक्सी अपार्टमेंट सोडणार? मुंबईत समुद्रकिनारी सहा मजली नव्या घराची तयारी

"संघाबद्दल आपुलकी असेल तर ती मनात ठेवा नाहीतर..."; विश्वास नांगरे पाटलांवर राज ठाकरे संतापले

अचानक झाडाची फांदी डोक्यावर पडल्याने दुचाकीस्वार कोमात, घटना सीसीटीव्हीत कैद