मुंबई

कोस्टल रोडच्या कामात वेळकाढूपणा करणाऱ्या कंत्राटदारांना ३५ कोटींचा दंड; RTI मधून खुलासा

सद्यस्थितीत कोस्टल रोडचे ९१ टक्के काम पूर्ण झाले असून संपूर्ण कोस्टल रोड मुंबईकरांच्या सेवेत कधीपर्यंत सेवेत येईल, याची डेडलाईन दिलेली नाही. कोस्टल रोड प्रकल्पात कामात उशीर करणाऱ्या कंत्राटदारांना मात्र ३५ कोटींचा दंड ठोठावल्याचे माहिती अधिकारातून समोर आले आहे.

Swapnil S

मुंबई : मुंबईतील वाहतूककोंडी फोडण्यासाठी कोस्टल रोड महत्त्वपूर्ण ठरणार आहे. ऑक्टोबर २०१८ मध्ये कोस्टल रोडच्या कामाचा शुभारंभ झाला. सद्यस्थितीत कोस्टल रोडचे ९१ टक्के काम पूर्ण झाले असून संपूर्ण कोस्टल रोड मुंबईकरांच्या सेवेत कधीपर्यंत सेवेत येईल, याची डेडलाईन दिलेली नाही. कोस्टल रोड प्रकल्पात कामात उशीर करणाऱ्या कंत्राटदारांना मात्र ३५ कोटींचा दंड ठोठावल्याचे माहिती अधिकारातून समोर आले आहे.

कोस्टल रोड प्रकल्पाचे काम पूर्ण करण्याची देण्यात आलेली डेडलाईन चुकली आहे. याबाबतची माहिती सामाजिक कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुंबई महानगरपालिकेकडे माहिती अधिकारातून विचारली होती. मुंबई किनारा रस्ता प्रकल्प विभागाने त्यांना दिलेल्या माहितीनुसार, मुंबई किनारा रस्ता प्रकल्पाचे काम ३ भागामध्ये विभागले आहे. भाग-१ अंतर्गत प्रियदर्शनी पार्क ते बडोदा पॅलेसपर्यंतचे काम मेसर्स लार्सन अँड टुब्रो यांस दिले असून त्यांना आतापर्यंत या कामात ११.६३ कोटींचा दंड आकारला आहे. यापूर्वी भाग-१ चे काम पूर्ण करण्याची मूळ तारीख १२ ऑक्टोबर २०२२ होती. या कामास ९ जून २०२३, १० सप्टेंबर २०२३ आणि २२ मे २०२५ अशी तीन वेळा मुदतवाढ देण्यात आली आहे.

भाग-२ अंतर्गत बडोदा पॅलेस ते वांद्रे वरळी सागरी सेतूच्या दक्षिण टोकापर्यंतचे काम मेसर्स एचसीसी-एचडीसी यांस दिले असून या कामात १६.१३ कोटींचा दंड आकारला आहे. भाग-२ चे काम पूर्ण करण्याची मूळ तारीख १५ ऑक्टोबर २०२२ होती. या कामास ६ ऑक्टोबर २०२३, ७ ऑक्टोबर २०२३ आणि २५ ऑक्टोबर २०२४ अशी तीन वेळा मुदतवाढ देण्यात आली आहे.

भाग-४ अंतर्गत प्रिन्सेस स्ट्रीट ते प्रियदर्शनी पार्कपर्यंतचे काम मेसर्स लार्सन अँड टुब्रो यांस दिले असून आतापर्यंत या कामात ७.२५ कोटींचा दंड आकारला आहे. भाग-४ चे काम पूर्ण करण्याची मूळ तारीख १२ ऑक्टोबर २०२२ होती. या कामास २५ मे २०२३, २६ नोव्हेंबर २०२३ आणि २ एप्रिल २०२४ अशी तीन वेळा मुदतवाढ देण्यात आली आहे. आजतागायत ९१ टक्के काम पूर्ण झाले असून प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात आहे. लार्सन अँड टूर्बोतर्फे २३ जुलै २०२४ रोजी लेखी पत्र पाठवून १८१ दिवसाची मुदतवाढ मागितली आहे. यात ८ कारणे सांगत मुदतवाढ मागितली आहे, अशी माहिती आरटीआयमधून समोर आली आहे.

आता 'नाईन्टी'चा फॉर्म्युला! मविआचे तिन्ही प्रमुख पक्ष ८५ नव्हे, प्रत्येकी ९० जागा लढवणार

पूर्व लडाखमधून भारत-चीन सैन्याची माघार सुरू; वेगवेगळ्या दिवशी गस्त घालण्याचा दोन देशांचा निर्णय

ज्ञानवापीच्या अतिरिक्त सर्वेक्षणाची हिंदू पक्षकारांची मागणी फेटाळली; उच्च न्यायालयात दाद मागणार

राष्ट्रवादी अजित पवार गटात 'आयारामां'ची चलती; सात उमेदवारांची दुसरी यादी जाहीर

महायुतीचे २७७ जागांवर ठरले; भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांची माहिती