मुंबई

समृद्धी महामार्ग गडचिरोलीपर्यंत वाढविण्यात येणार; दर्जेदार कामासाठी रेडिमिक्स वापरण्याच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिल्या सूचना

प्रतिनिधी

हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग नागपूर ते भंडारा, गोंदिया, आणि नागपूर ते गडचिरोलीपर्यंत पुढे वाढविण्यात येणार आहे. गडचिरोलीपर्यंतच्या टप्प्याचा सविस्तर प्रकल्प अहवाल बनविण्याचे काम प्रगतिपथावर असून, भूसंपादन प्रक्रिया आणि इतर बाबींसाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत दिली.

चालू आर्थिक वर्षाच्या नगरविकास, सार्वजनिक बांधकाम विभाग, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य आणि नियोजन विभागाच्या पुरवणी मागण्यांवरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री शिंदे बोलत होते.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, समृद्धी महामार्गाला हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नाव दिले आहे. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचे काम युद्धपातळीवर, तातडीने करण्यात येईल. रेवस-रेड्डी महामार्गाच्या भूसंपादनासाठी सुमारे १५० कोटी रुपयांची पूरक मागणी प्रस्तावित केली आहे. पुणे शहरातील रिंगरोडच्या भूसंपादनासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला २५० कोटी रुपये वर्ग केले आहेत. रांजनोली-मानकोली उड्डाणपुलावरील काही भागातील खड्डे बुजविण्यासाठी कोल्डमिक्सचा वापर करण्यात आला आहे. दर्जेदार कामासाठी रेडिमिक्स वापरण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्याचे शिंदे यांनी सांगितले.

स्कायवॉकची उपयुक्तता तपासणार 

आरे वसाहतीमधील रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याच्या सूचना महापालिकेला दिल्या आहेत. मेट्रो मार्ग-५चा विस्तार करण्यात येणार आहे. ही मार्गिका ठाणे-भिवंडी-कल्याण पुढे शहाड-टिटवाळापर्यंत नेण्याबाबत आवश्यकतेनुसार विचार करण्यात येईल. ‘एमएमआरडीए’च्या माध्यमातून पठाणवाडी येथील रिटेनिंग वॉलसंदर्भातील कार्यवाही करण्यात येईल. मुंबई महानगरात ‘एमएमआरडीए’च्या माध्यमातून स्कायवॉक बांधण्यात आलेले आहेत. या स्कायवॉकची उपयुक्तता पाहण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका आणि ‘एमएमआरडीए’च्या माध्यमातून आढावा घेण्यात येणार आहे. अनेक ठिकाणी स्कायवॉकचा वापर ज्येष्ठांना करताना अडचणी निर्माण होतात, त्यासाठी सरकते जिने, अथवा उदवाहने बसविण्याचा विचार आहे.

नागपूर धर्तीवर पुण्यात डबलडेकर मेट्रो 

काही नगरपालिकांची आर्थिक परिस्थिती पाहता विकासकामे थांबणार नाहीत, याची दक्षता घेण्यात येईल. कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर नवीन रस्ते डांबरीकरणाचे आणि काँक्रीटीकरणाचे काम हाती घेतले आहे. गणेशोत्सवापूर्वी सर्व रस्ते सुस्थितीत करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. स्वारगेट-कात्रज भुयारी मेट्रो मार्गाचा सविस्तर प्रकल्प आराखडा तयार करून तो केंद्राला वित्तीय व तांत्रिक मान्यतेसाठी पाठवला आहे, केंद्राच्या मान्यतेनंतर या प्रकल्पाचे काम सुरू करण्यात येईल आणि निधी उपलब्ध करून देण्यात येईल. खडकवासला-स्वारगेट पुलगेट हडपसर-लोणी काळभोर या मार्गावर मेट्रो रेल्वे प्रकल्प राबविण्यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या प्रकल्पामध्ये नागपूर मेट्रोच्या धर्तीवर डबलडेकरच्या समावेशाबाबतचा निर्णय घेण्यात येईल.

का वाढेना मतदानाचा टक्का?

जपायला हवा, दाभोलकरांचा वारसा

"काँग्रेसमुळं देशाची पाच दशके वाया गेली..."शिवाजी पार्क सभेतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल

"पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यानंतर...", राज ठाकरेंकडून पंतप्रधान मोदींची पंडित नेहरूंशी तुलना

पंतप्रधान नरेंद्र मोदी सभास्थळी पोहोचले, शिवाजी पार्कात काय बोलणार मोदी?