मुंबई

मानवी हस्तक्षेपामुळे हिरव्या फुफ्फुसांची गुदमरलेली हाक; संजय गांधी राष्ट्रीय उद्यान वाचवा, नाहीतर शहर श्वास रोखेल

मुंबई-ठाण्याचे 'हृदय' म्हणून ओळखले जाणारे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आज गंभीर धोक्याच्या उंबरठ्यावर उभे आहे. एकेकाळी सुमारे १०४ चौरस किमी विस्तारलेले हे हिरवेगार अभयारण्य दिवसागणिक आकुंचन पावत असून मानवी हस्तक्षेपामुळे त्याची व्याप्ती कमी होत चालली आहे. जागतिक वन दिवसनिमित्ताने या चिंताजनक वास्तवाकडे पुन्हा एकदा लक्ष वेधले जात आहे.

Swapnil S

ठाणे : मुंबई-ठाण्याचे 'हृदय' म्हणून ओळखले जाणारे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आज गंभीर धोक्याच्या उंबरठ्यावर उभे आहे. एकेकाळी सुमारे १०४ चौरस किमी विस्तारलेले हे हिरवेगार अभयारण्य दिवसागणिक आकुंचन पावत असून मानवी हस्तक्षेपामुळे त्याची व्याप्ती कमी होत चालली आहे. जागतिक वन दिवसनिमित्ताने या चिंताजनक वास्तवाकडे पुन्हा एकदा लक्ष वेधले जात आहे. शहराच्या वेगवान विकासाच्या नादात हे नैसर्गिक 'फुफ्फुस' गुदमरू लागले असून त्याचा थेट परिणाम येथील समृद्ध जैवविविधतेवर होत आहे.

या उद्यानात बिबटे, हरणे, ससे, विविध सर्पप्रजाती तसेच शेकडो पक्ष्यांचे अधिवास आहेत. मात्र जंगलाचा परिसर कमी होत गेल्याने त्यांच्या निवासस्थानांवर गदा येत आहे. परिणामी वन्यजीव शहराच्या दिशेने वळत असून मानव-वन्यजीव संघर्षाच्या घटना वाढू लागल्या आहेत. तज्ज्ञांच्या मते, हे केवळ वन्यजीवांचे संकट नसून संपूर्ण पर्यावरणीय संतुलन ढासळण्याचा इशारा आहे.

स्थानिक नागरिक आणि पर्यावरणप्रेमींच्या म्हणण्यानुसार, काही भागांमध्ये राजकीय पाठबळ असलेली बिल्डर लॉबी तसेच भूमाफिया उद्यानाच्या सीमेलगत अतिक्रमण करत आहेत. बफर झोन हळूहळू कमी होत असून जंगलाच्या मूळ भागालाही धोका निर्माण होत आहे. योग्य नियोजनाचा अभाव, अपुरी देखरेख आणि कठोर कारवाईचा अभाव यामुळे ही समस्या दिवसेंदिवस तीव्र होत आहे.

उद्यानातील जलस्रोतांची स्थितीही चिंताजनक आहे. तलाव, ओढे आणि नैसर्गिक जलप्रवाह अतिक्रमण आणि प्रदूषणामुळे आटण्याच्या मार्गावर आहेत. या जलस्रोतांचा परिणाम फक्त उद्यानापुरता मर्यादित नसून संपूर्ण मुंबई-ठाणे परिसराच्या हवामानावर, पर्जन्यमानावर आणि भूजल पातळीवर होत आहे. वनदिनाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरण अभ्यासक आणि जागरूक नागरिकांनी भावनिक आवाहन केले आहे की, "हे फक्त जंगल नाही, तर शहराचा श्वास आहे. हे हिरवे आवरण नष्ट झाले, तर भविष्यातील पिढ्यांना स्वच्छ हवा आणि सुरक्षित पर्यावरण मिळणार नाही." अतिक्रमण रोखणे, बफर झोनचे काटेकोर संरक्षण, स्थानिकांचा सहभाग वाढवणे आणि शाश्वत विकासाची अंमलबजावणी करणे ही काळाची गरज असल्याचे ते सांगतात.

आज जागतिक वन दिवस साजरा करताना केवळ झाडे लावण्यापुरते मर्यादित न राहता, आपल्या डोळ्यांसमोर आकुंचन पावत चाललेल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाला वाचवण्यासाठी कडक पावले उचलण्याची गरज आहे. कारण जंगल वाचले तरच शहर वाचेल आणि शहर वाचले तरच आपले भविष्य सुरक्षित राहील.
डॉ. प्रशांत सिनकर (पर्यावरण अभ्यासक ठाणे)

तीन रखडलेले पूल ऑक्टोबर महिन्यात सेवेत; सायन पुलाची डेडलाइन पुन्हा हुकली, विद्याविहार गोरेगाव-चित्रनगरी उड्डाणपूल अंतिम टप्यात

Thane : एसटीचे 'आवडेल तेथे कोठेही प्रवास पास' आता ऑनलाइन; चार आणि सात दिवसांचे पास घरबसल्या काढता येणार

Thane : पूर्णेकर हत्या प्रकरणी सत्ताधारी -विरोधक आमने-सामने; निष्पक्ष तपासाची आरोप-प्रत्यारोपांना धार

Mumbai : ठाकरे बंधूंचा आज गर्जना मोर्चा

Mumbai : वांद्रे-सी लिंक ते गोरेगाव आता सुसाट; ५० मिनिटांचा प्रवास १५ मिनिटांत, उन्नत मार्ग दीड वर्षांत पूर्ण होणार