देवश्री भुजबळ/मुंबई
विकास म्हणजे विनाश, विस्थापन आणि आपत्ती असे समीकरण सध्या तयार झाले आहे. पूर्वीची सरकारे अर्थव्यवस्था आणि पर्यावरण यांच्यात समतोल राखण्याचा प्रयत्न करायची, मात्र आता तो कुठेही दिसत नाही. मुंबईतही पर्यावणाचे प्रश्न असून मुंबईचे कांदळवन आणि नद्या वाचवण्यासाठी जनआंदोलन उभे करायला हवे, असे आवाहन ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ आणि 'जलपुरुष' राजेंद्र सिंह यांनी केले. मुंबईत डॅरिल डी'मॉन्टे स्मृती व्याख्यानात ते बोलत होते.
अरवली पर्वत वाचवण्यासाठीच्या मोहिमेमुळे चर्चेत आलेल्या सिंह यांनी न्यायालयांविषयीही आपली नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले की, सध्याच्या सरकारला आपणच सर्वोच्च आहोत असे वाटते आणि न्यायालये ही सरकारचाच भाग असल्याची स्थिती आहे. अशा परिस्थितीत केवळ लोक चळवळच मुंबईला विनाशापासून वाचवू शकते. मुंबईला आपत्तीमुक्त करण्यासाठी नद्यांचे पुनरुज्जीवन आणि कांदळवन संरक्षणासाठी विशेष नियोजनाची गरज आहे.
किनारी रस्ता (कोस्टल रोड) प्रकल्पाच्या उत्तर भागामुळे बाधित होणाऱ्या ४५ हजार कांदळवनांच्या रक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेणारे 'वनशक्ती' या संस्थेचे संचालक स्टॅलिन डी. यांनीही राजेंद्र सिंह यांच्या विधानाचे समर्थन केले. मुंबईतील जनहित याचिकांबाबत न्यायालयाकडून पुरेसा वेळ दिला जात नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. दरम्यान, मुंबईतील पर्यावरणप्रेमी ४५ हजार कांदळवने वाचवण्यासाठी आता मोठ्या आणि एकत्रित जनआंदोलनाची तयारी करत असल्याची माहिती पर्यावरण कार्यकर्ते जी. आर. व्होरा यांनी दिली.
मिठी वाचवण्यासाठी चळवळ मंदावली
मिठी नदीच्या पुनरुज्जीवनाची २०१२ मध्ये सुरू झालेली चळवळ आता मंदावली आहे. निसर्गाचा हा ऱ्हास थांबवण्यासाठी लोकांनी रस्त्यावर येण्याची आणि कामात सातत्य ठेवण्याची गरज असल्याचे सिंह यांनी नमूद केले. मुंबईतील नद्या वाचवण्यासाठी यात्रा काढण्याची वेळ आली असून नागरिकांनी एकत्र येऊन या पर्यावरणीय संकटाचा सामना केला पाहिजे, असेही ते म्हणाले.
पुन्हा निसर्गाकडे वळण्याची गरज
पूर्वीच्या काळी आपत्ती निवारण हे निसर्गातच शोधले जायचे, कृत्रिम बुद्धिमत्तेत (एआय) नाही. दुष्काळ आणि पुरापासून वाचण्यासाठी माणसाला पुन्हा निसर्गाकडे वळण्याची गरज आहे. केवळ जमिनीवर एकत्र येऊन लढल्यानेच पर्यावरणाचे रक्षण होऊ शकते, असा सिंह यांनी व्यक्त केला.