मुंबई : सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोड (एससीएलआर) विस्तार प्रकल्पातील पश्चिम द्रुतगती महामार्गावरील केबल-स्टेड ब्रिजची स्थापत्य कामे पूर्ण झाले आहेत. दक्षिण आशियातील अशा प्रकारचा हा पहिला केबल-स्टे ब्रिज असून त्यामध्ये १०० मीटरचे तीव्र वळण आहे. या ब्रिजच्या अंतिम टप्प्यातील कामे अद्याप सुरू असून हा मार्ग लवकरच प्रवाशांच्या सेवेत येणार आहे. यामुळे बीकेसी, वाकोल्यातील वाहतूक कोंडी कमी होण्याचा अंदाज आहे.
सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोड ( एससीएलआर) विस्तार प्रकल्पाचे काम २०१६ मध्ये हाती घेण्यात आले. हा प्रकल्प २०१९ मध्ये पूर्णत्वास जाणे अपेक्षित होते. मात्र प्रकल्पाचे डिझाइन, लॉकडाऊन यामुळे प्रकल्पामध्ये अडचणी निर्माण झाल्या होत्या. यामुळे प्रकल्पाचे काम अनेक वर्षांपासून रखडले होते. अखेर एससीएलआर केबल-स्टे ब्रिजचे काम पूर्ण करण्यात कंत्राटदाराला यश आले आहे. कंत्राटदाराने नुकतेच केबल-स्टे ब्रिजची फायनल वजन चाचणी पूर्ण केली आहे.
पुलाची वैशिष्ट्ये
२१५ मीटर लांबीचा ऑर्थोट्रॉपिक स्टील डेक असलेला पूल
वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवरील उड्डाणपुलावरून जाणारा २५ मीटर उंचीवर असलेला पूल
रुंदी : १०.५ मी ते १७.२ मी – दोन पदरी मार्ग
मेट्रो लाइन ३ आणि इतर भूमिगत सुविधांना धक्का न लावता बांधलेला
कुर्ला ते पानबाई शाळेपर्यंत थेट मार्ग – विमानतळाच्या अगदी आधी
ईस्टर्न वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे दरम्यान सिग्नल-विरहित आणि अखंड वाहतूक
प्रकल्पाचे महत्त्व
कुर्ला ते विमानतळ सिग्नलविरहित वाहतूक
वाकोला, बीकेसी आणि एलबीएस मार्गावरील वाहतूककोंडी कमी होणार
प्रवासाचा वेळ व इंधन वाचणार
एससीएलआर, पूर्व द्रुतगती महामार्ग आणि पश्चिम द्रुतगती महामार्गाला जोडणार