मुंबई

गुढीपाडव्याला ‘सेन्सेक्स’ आडवा; तेल दराच्या भडक्यात शेअर बाजाराची होरपळ

गेल्या सलग तीन सत्रातील तेजी नोंदविणाऱ्या शेअर बाजाराची वरच्या टप्प्यावरील निर्देशांकाची गुढी अखेर गुरुवारी उतरली.

Swapnil S

मुंबई : गेल्या सलग तीन सत्रातील तेजी नोंदविणाऱ्या शेअर बाजाराची वरच्या टप्प्यावरील निर्देशांकाची गुढी अखेर गुरुवारी उतरली. सेन्सेक्स आणि निफ्टी एकाच सत्रात तब्बल प्रत्येकी ३.२५ टक्क्यांहून अधिक प्रमाणात आपटले.

बीएसई सेन्सेक्स २,४९६.८९ अंकांनी कोसळत ७४,२०७.२४ पर्यंत स्थिरावला. निर्देशांकातील एका सत्रातील ही घसरण जून २०२४ नंतरची सर्वात मोठी ठरली, तर निर्देशांकाचा बंद स्तर हा ७ एप्रिल २०२५ नंतरचा सर्वात नीचांकी नोंदला गेला आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीने गुरुवारी ७७५.६५ अंशांची आपटी नोंदवित २३ हजाराचा किमान स्तर गाठला.

गेल्या तीन व्यवहारात निफ्टीमध्ये २.६८ टक्के म्हणजेच ६२६ अंकांची वाढ झाली होती. तर सेन्सेक्स यादरम्यान २.८ टक्के (२,१४० अंकांनी) वाढला होता.

गुंतवणूकदारांच्या संपत्ती १२.८७ लाख कोटींनी घटली

गुरुवारी सेन्सेक्सच्या पडझडीत मुंबई शेअर बाजारातील गुंतवणूकदारांचे १२.८७ लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले. २८ फेब्रुवारी रोजी पश्चिम आशियातील संकट उफाळून आल्यापासून गुंतवणूकदारांना ३७ लाख कोटींहून अधिक रुपयांचे नुकसान सोसावे लागले आहे.

कच्चे तेल ११४ डॉलरवर

पश्चिम आशियातील वाढत्या तणावामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत गुरुवारी प्रचंड वाढ नोंदली गेली. कच्च्या तेलाच्या किंमती प्रति पिंप ११४ डॉलरवर झेपावल्याने भांडवली बाजारात सूचिबद्ध सरकारी तेल कंपन्यांचे शेअर मोठ्या प्रमाणात आपटले. इराणने कतारमधील एका महत्त्वाच्या नैसर्गिक वायू प्रकल्पावर, कुवेतमधील दोन तेल शुद्धीकरण प्रकल्पांवर हल्ला केल्यानंतर जागतिक तेलाचा प्रमुख मापदंड असलेल्या 'ब्रेंट क्रूड'च्या किमती ६.७५ टक्क्यांनी वधारून ११४.८ अमेरिकन डॉलर्स प्रति बॅरल या पातळीवर पोहोचल्या.

'ऑल इंडिया सराफा असोसिएशन'च्या माहितीनुसार, ९९.९ टक्के शुद्धतेच्या सोन्याच्या दरात ४.३७ टक्क्यांची घसरण झाली. मागील सत्रात बाजार बंद होताना सोन्याचा दर १,६०,३०० रुपये प्रति १० ग्रॅम होता. २९ जानेवारी रोजी सोन्याने १,८३,००० रुपये प्रति १० ग्रॅमचा आपला आतापर्यंतचा सर्वोच्च दर नोंदवला होता. त्या पातळीपासून सोन्याचे दर १६.२३ टक्क्यांनी खाली आले आहेत.

चांदीच्या दरातील घसरण जवळपास ७ टक्क्यांची झाली. बुधवारी चांदीचा दर २,५६,५०० रुपये प्रति किलो होता. २९ जानेवारी रोजी चांदीने ४,०४,५०० रुपये प्रति किलोचा आतापर्यंतचा सर्वोच्च दर गाठला होता. त्या पातळीपासून आता चांदीचे दर १,६५,८०० रुपयांनी (४१ टक्के) खाली आले आहेत.

सोने, चांदीत घसरण

जागतिक विक्रीच्या लाटेमुळे गुरुवारी देशाच्या राजधानीत चांदीचे दर १७,८०० रुपयांनी घसरून २,३८,७०० लाख रुपये प्रति किलोवर आले, तर सोन्याचे दर ७ हजार रुपयांनी कमी होऊन १,५३,३०० रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचले.

Mumbai : औषध विक्रेत्यांचा आज देशव्यापी बंद

Pune : दगडूशेठ हलवाई गणपतीला ‘अ’ वर्ग पर्यटन स्थळाचा दर्जा

तुकाराम मुंढेंसह सहा सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

रेबीजग्रस्त, गंभीर आजारी कुत्र्यांना मारण्यास परवानगी; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश, सर्व याचिका फेटाळल्या

Weather Update : अर्ध्या देशात पुढील ६ दिवस उष्णतेची लाट