मुंबई : सोनिया गांधी यांच्या पुस्तकाचा निषेध करण्यासाठी बुधवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत अनवधानाने बाळासाहेब ठाकरे यांचे छायाचित्र फाडले गेल्यामुळे टीकेच्या भोवऱ्यात सापडलेल्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या प्रवक्त्या शायना एन.सी. यांनी अखेर दुसऱ्याच दिवशी म्हणजे गुरुवारी माफी मागितली आहे.
शायना यांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकत बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयीच्या आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. मात्र, ठाकरेंच्या शिवसैनिकांनी, जोपर्यंत शायना एनसी यांच्यावर योग्य ती कारवाई होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत शायना एनसी यांच्याकडून अनावधानाने ही चूक घडली होती. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी शायना एनसी यांना भेटायला बोलावले होते. या सगळ्यानंतर शायना यांनी घडलेल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे. तथापि, ठाकरेंच्या शिवसैनिकांनी शायना एनसी यांच्याविरोधात आंदोलनाची हाक दिली असल्यायने यानंतर हा वाद थांबण्याची शक्यता फार कमी दिसत आहे. आता शायना एनसी यांनी माफी मागितल्याने ठाकरे गट आपली तलवार म्यान करणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
शायनांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी
तर खासदार संजय राऊत यांनीही शायना एनसी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. बाळासाहेब ठाकरे यांचा अपमान सहन करणार नाही, असे ठाकरे गटाने स्पष्ट केले आहे. ठाकरे गटाच्या महिला कार्यकर्त्यांनी शायना एनसी यांना प्रवक्ते पदावरून हटवण्याची मागणीही केली आहे. आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी ‘सरकारचा निषेध असो’, ‘खाली डोकं वर पाय’ आणि ‘शायनाचा जाहीर निषेध’ अशा घोषणा देत आपला संताप व्यक्त केला.