मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शुक्रवारी दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत. मावळते राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या सन्मानार्थ आयोजित कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी दोघेजण जात असले तरी मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर दोघांच्या दिल्ली भेटीला महत्व आले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शुक्रवारी अधिकृत दिल्ली दौऱ्यावर जात आहेत. विशेष म्हणजे फडणवीस यांचा २२ जुलै रोजी वाढदिवस देखील असतो. मावळते राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या सन्मानार्थ दिल्लीत स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री यांना या कार्यक्रमाचे आमंत्रण आहे. त्यासाठीच दोघे दिल्लीला जात आहेत; मात्र दोघांच्या दिल्ली भेटीला राजकीय महत्वही आहे. कारण अद्यापही मंत्रीमंडळ विस्तार रखडला आहे. न्यायालयातील अपात्रतेच्या याचिकेवरील सुनावणी हे यामागचे मोठे कारण असल्याचे मानण्यात येत आहे; मात्र आता याबाबत काहीतरी निर्णय घ्यावाच लागणार आहे.