मुंबई : विधानसभा निवडणुकांमध्ये मिळालेले यश पाहता आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी महायुतीतील घटक पक्षांनी एकत्र येऊन निवडणूक लढवायला पाहिजे. विधानसभा निवडणुकीत जसा सर्व पक्षांना फायदा झाला त्याचप्रमाणे पालिका निवडणुकांमध्येही होईल, असा विश्वास शिंदेसेनेचे प्रवक्ते अरुण सावंत यांनी व्यक्त केला आहे. मात्र, भाजपची एकूणच ताकद वाढली असल्याचे सांगत भाजप कोणताही निर्णय घेण्यास इतक्यात राजी नाही. त्यामुळे शिंदेसेनेच्या गोटात अस्वस्थता पसरली आहे.
आगामी मुंबई महापालिका निवडणुकांसाठी शिवसेना उबाठा गटाने मुंबईत बैठका घेण्यास सुरुवात केली आहे, तर शिंदे सेनेच्या आमदार आणि पदाधिकाऱ्यांचीही नुकतीच या संदर्भात बैठक पार पडली. मुंबईतील मतदारांचा विधानसभेत मिळालेल्या प्रतिसाद पाहता आगामी निवडणुकीतसुद्धा महायुती म्हणून एकत्र निवडणुका लढवाव्यात, अशी अपेक्षा शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून व्यक्त होत आहे. मात्र, शिंदेसेनेच्या या आवाहनाला महायुतीतील मुख्य घटक पक्ष असलेल्या भाजपकडून अद्याप प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे शिंदेसेनेच्या गोटात अस्वस्थता पसरली आहे.
या संदर्भात शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते अरुण सावंत यांनी सांगितले की, विधानसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी महायुतीने घेतलेल्या लोकोपयोगी योजना गोरगरीब जनतेशी शिंदे यांचा सुसंवाद अडीच वर्षातील विकासकामे याच्यावर विश्वास ठेवून जनतेने मतदान केले होते. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकासुद्धा महायुतीने शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांना सोबत घेऊनच लढवाव्यात तरच महानगरपालिकेवर भगवा फडकविता येईल. मात्र भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांची याबाबत वेगळी भूमिका आहे. ते म्हणतात, मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या दृष्टीने आमची प्रभाग स्तरावर तयारी सुरू आहे. सर्व प्रभागात कार्यकर्त्यांची बांधणी सुरू केली आहे. या निवडणुकांमधील युतीचा निर्णय हा स्थानिक पातळीवर घेतला जातो. त्या त्या वेळची परिस्थिती आणि ताकद पाहून असे निर्णय होतात.