मुंबई : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीची घोषणा होताच शिवाजी पार्क मैदान सभेसाठी मिळावे यासाठी मनसेसह ठाकरे व शिंदे सेनेने पालिकेच्या ‘जी-उत्तर’ विभागाकडे अर्ज केले आहेत. ११, १२ व १३ जानेवारी या तारखांपैकी १ दिवस मिळावा, अशी मागणी तिन्ही पक्षांनी केली आहे. त्यामुळे शिवाजी पार्क मैदानात कोणाची तोफ धडाडणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
मुंबई महानगरपालिकेची निवडणूकजाहीर होताच सर्वंच राजकीय पक्षांनी पालिकेची सत्ता काबीज करण्यासाठी रणनीती आखली आहे. मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी चौकसभा, घरोघरी प्रचार, गृहभेटी यावर भर असणार आहे. १५ जानेवारीला मतदान होणार असून १३ जानेवारीला सायंकाळी ५ वाजता प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. या पार्श्वभूमीवर शिवाजी पार्क मैदान आरक्षित करण्यासाठी प्रमुख पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना, एकनाथ शिंदे यांची शिवसेना व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाने दादर येथील शिवाजी पार्क मैदान मिळावे यासाठी पालिकेकडे अर्ज केला असून पालिका प्रशासन कोणाला व कुठल्या तारखेला परवानगी देते याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेकडून आमदार महेश सावंत, मनसेकडून यशवंत किल्लेदार व एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून माजी आमदार सदा सरवणकर यांनी पालिकेकडे अर्ज दाखल केला आहे.