मुंबई : मशीद बंदर रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर असलेला व पी. डि’ मेलो मार्गाला जोडणाऱ्या सिंदूर (पूर्वीचे कर्नाक) रेल्वे उड्डाणपुलाचे लोकार्पण गुरुवार १० जुलै रोजी सकाळी १० वाजता होणार आहे. या लोकार्पण सोहळा मुख्यामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व उपमुख्य मंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यलमंत्री अजितदादा पवार, विधानसभा अध्याक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांच्यां प्रमुख उपस्थितीत होणार आहे.
राज्याचे माहिती तंत्रज्ञान, सांस्कृतिक कार्य मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आशिष शेलार, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे सहपालकमंत्री मंगल प्रभात लोढा तसेच स्थानिक खासदार अरविंद सावंत, आमदार सुनिल शिंदे, आमदार राजहंस सिंह, महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्यासह विविध मान्यवरांची या सोहळ्यास उपस्थिती असणार आहे.
दक्षिण मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मशीद बंदर आणि मोहम्मद अली मार्ग परिसरातील वाहतुकीसाठी सिंदूर (पूर्वीचे कर्नाक) पूल महत्त्वाचा आहे. १५० वर्ष जुना कर्नाक पूल धोकादायक झाल्याचे मध्य रेल्वे प्रशासनाने घोषित केले. त्यानंतर मध्य रेल्वे प्रशासनाने ऑगस्ट २०२२ मध्ये पुलाचे निष्कासन केले. मशीद बंदर परिसरात पूर्व आणि पश्चिम परिसर जोडणारा विद्यमान मार्ग कायम ठेवण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने या पुलाची पुनर्बांधणी केली आहे.