शेफाली परब-पंडित/मुंबई
मुंबईतील महत्त्वाचा पूर्व-पश्चिम दुवा असलेला सायन रेल्वे उड्डाणपूल (आरओबी) पुन्हा एकदा वादाच्या आणि विलंबाच्या भोवऱ्यात सापडला आहे. रेल्वे हद्दीतील पहिल्या गर्डरच्या लॉचिंगला झालेल्या विलंबामुळे हा प्रकल्प अधिक लांबणीवर पडला आहे. यामुळे आता हा पूल १५ ऑगस्टपूर्वी वाहतुकीसाठी खुला होणे कठीण असल्याचे दिसत आहे.
ऑगस्ट २०२४ पासून हा पूल वाहतुकीसाठी बंद असल्याने हजारो वाहनचालक आणि पादचाऱ्यांना प्रचंड त्रासाला आणि गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. मुंबई महानगरपालिका आणि मध्य रेल्वे यांच्या वतीने या पुलाचे बांधकाम सुरू आहे. रेल्वे ट्रॅकवरील पुलाचे काम मध्य रेल्वे करत आहे, तर महापालिका पोहोच रस्ते आणि पादचारी भुयारी मार्गाचे काम करत आहे.
रेल्वे हद्दीतील पहिल्या गर्डरचे काम ३० एप्रिलला अपेक्षित होते, ते नंतर ३१ मे पर्यंत पुढे ढकलले गेले होते. आता त्यात पुन्हा बदल होऊन ते १० जूनपर्यंत पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे. त्यानंतर दुसऱ्या गर्डरचे काम जे २० जूनला नियोजित होते, ते आता ३० जूनपर्यंत पुढे ढकलण्यात आले आहे.
लवकरात लवकर काम पूर्ण करणार
'पश्चिम बाजूच्या पोहोच रस्त्याचे काम ३० जूनपर्यंत पूर्ण अपेक्षित आहे. दुसऱ्या गर्डरचे काम पूर्ण झाल्यानंतर पूर्व बाजूच्या पोहोच रस्त्याचे काम सुरू होईल. हे सर्व काम पूर्ण झाल्यावर १५ ऑगस्टपर्यंत पूल वाहतुकीसाठी खुला करण्याचा आमचा प्रयत्न आहे', अशी माहिती महापालिकेचे अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी दिली.
रहिवासी, प्रवाशांची गैरसोय
पूल बंद असल्यामुळे लोकांना लांबचा फेरा मारावा लागत असून सायन, धारावीमधील विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. दरम्यान, महापालिकेने रेल्वेसोबत समन्वय साधून हे काम युद्धपातळीवर पूर्ण करणे गरजेचे आहे, असे सायनमधील भाजप नगरसेविका आणि शिक्षण समितीच्या अध्यक्षा राजेश्री शिरवडकर यांनी सांगितले.
खर्चात वाढ
या प्रकल्पाचा खर्च सुरुवातीला ४२ ८ कोटी रुपये होता, तो आता स्टील गर्डर आणि पोहोच रस्त्यांच्या कामांमुळे ५० कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे. दरम्यान, या विलंबाबाबत मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.