मुंबई : मुंबईच्या रस्त्यांवर धावणाऱ्या वाहनांमुळे प्रदूषणात वाढ होण्याचा धोका अधिक असतो. वाहनातील इंधनातून निघणारा हानीकारक धूर प्रदूषणास कारणीभूत ठरत असल्याने सुरुवातीला बेस्टच्या बसेसमध्ये धूर फिल्टर मशीन बसवण्यात येणार आहेत. एकूण ३५० बसेसमध्ये धूर फिल्टर मशीन बसवण्यात येणार असून नव्याने घेण्यात येणाऱ्या बसेसमध्ये कंपनीतून मशीन बसवण्यात येतील, अशी माहिती मुंबई शहराचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिली.
मुंबईतून पाऊस गेल्यानंतर हवेतील गुणवत्तेवर परिणाम जाणवू लागला आहे. प्रदूषणात वाढ होत असल्याने मुंबईकरांच्या आरोग्यावर परिणाम होण्याचा धोका अधिक आहे. वाढत्या प्रदूषणावर मुंबई हायकोर्टानेही मुंबई महापालिकेची कानउघडणी केली. या पार्श्वभूमीवर पालिकेच्या माध्यमातून प्रदूषण रोखण्यासाठी अनेक उपाययोजना करण्यात येत असून आयआयटी, मुंबईसारख्या सहा तज्ज्ञ एजन्सी हवा प्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजनांबाबत काम करीत आहेत. मेट्रो, ट्रान्स हार्बर, कोस्टल रोड अशी ६००० कामे मुंबईत सुरू आहेत. त्याठिकाणी नियमावली जारी करण्यात आली आहे. वाहनातील इंधनातून निघणारा धूर हा प्रदूषणास कारणीभूत असून वाहनांपासून निर्माण होणारे प्रदूषण कमी करण्यासाठी ठोस उपाययोजना केल्या जाणार आहेत. यासाठी वाहनांमध्ये ‘व्हेईकल माऊंटेड फिल्टर’ बसवण्यात येणार आहेत. याची सुरुवात ‘बेस्ट’ उपक्रमापासून करण्यात येणार असल्याची माहिती दीपक केसरकर यांनी दिली.
बेकऱ्यांमध्ये जाळण्यात येणारे प्लायवूड धोकादायक
मुंबईत शहरी भागासह झोपडपट्ट्यांमध्ये ठिकठिकाणी असलेल्या बेकऱ्यांमध्ये जाळण्यात येणारे प्लायवूड धोकादायक ठरत आहे. जळणासाठी लाकूड महाग पडत असल्याने खराब प्लायवूडचा वापर बेकऱ्यांमध्ये केला जातो. मात्र प्लायवूड बनवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या रासायनिक द्रव्यांमुळे बेकऱ्यांमधून विषारी द्रव्ये बाहेर पडतात. त्यामुळे बेकऱ्यांमध्ये गॅसचा वापर करण्याच्या सूचना देण्यात येणार आहेत. तसेच चिमण्यांची उंची वाढवण्याचे निर्देश बेकरीचालकांना देण्यात येणार आहेत.
१० ठिकाणी एअर-प्युरिफायर
मुंबईत सर्वाधिक प्रदूषण होणाऱ्या जंक्शनच्या ठिकाणी हवा शुद्ध करण्यासाठी ‘एअर प्युरिफायर’ बसवण्यात येणार आहे. यामध्ये प्रायोगिक तत्त्वावर १० ठिकाणी ही ‘व्हर्च्युअल चिमणी’ प्रकारातील यंत्रणा बसवण्यात येणार आहे.
रेडिमिक्स काँक्रिट बनवणाऱ्या साईट बंदिस्त करा
धुळीचे कण शोषून शुद्ध हवा सोडणारी यंत्रणाही मुंबईच्या महत्त्वाच्या मैदानांवर बसवल्या जाणार आहेत. तसेच रेडिमिक्स काँक्रिट बनवणाऱ्या साईट बंदिस्त करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शिवाय झाडू मारताना उडणारी धूळ नियंत्रित करण्यासाठी ओलावा सोडणारी यंत्रणा वापरण्यात येणार आहे.
गोवंडीतील जैविक कचऱ्याचा प्लांट हलवणार
मागील अनेक वर्षापासून गोवंडीत बायोमेडिकल वेस्ट ट्रिटमेंट प्लांटच्या (जैविक कचरा) प्रदूषणामुळे येथील नागरिक हैराण आहेत. या प्लांटच्या चिमणीतून निघणाऱ्या धुरामुळे रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे. हा प्लांट गोवंडीतून हटवावा, अशी मागणी रहिवाशांकडून सातत्याने केली जात होती. सध्या मुंबईतील हवेचा दर्जा खालावल्याने प्रशासनाकडून प्रदूषणावर नियंत्रण आणण्यासाठी उपाययोजना केल्या जात असून याची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर प्रदूषणात भर टाकणारा गोवंडीतील जैविक कचऱ्याचा प्लांट अखेर हटवला जाणार असल्याची माहिती केसरकर यांनी दिली.