देवश्री भुजबळ
मुंबई : भारतातील गृहनिर्माण क्षेत्रातील विक्री आणि मागणीला वेग येत असताना मुंबई महानगर प्रदेश (एमएमआर) आता विकासाच्या नव्या टप्प्यात प्रवेश करत आहे. एकीकडे घरांची विक्री वाढत असतानाच, दक्षिण मुंबईत नव्या प्रकल्पांची मर्यादित संख्या आणि पुनर्विकासातून निर्माण झालेल्या घरांची वेगवान विक्री यामुळे उपलब्ध घरसाठा तब्बल ७४ टक्क्यांनी घटला आहे.
२०२१ ते २०२६च्या पहिल्या सहामाहीदरम्यान MMRच्या प्रमुख भागांतील उपलब्ध निवासी घरसाठ्यात मोठी घट झाली. नवी मुंबईतील साठा २४ टक्क्यांनी, तर ठाण्यात १९ टक्क्यांनी घटला. अटल सेतूमुळे सुधारलेली कनेक्टिव्हिटी, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे वाढलेली मागणी, टाउनशिपमधील विक्री आणि पायाभूत सुविधांच्या विकासाचा या भागांना फायदा झाला.
मुंबईच्या पारंपरिक सीमांपलीकडे रिअल इस्टेटचा विस्तार होत असून, पायाभूत सुविधांच्या विकासामुळे पश्चिम आणि परिघीय भागांमध्ये नव्या गृहप्रकल्पांची लाट आली आहे. ‘ॲॅनारॉक’च्या एमएमआर प्रदेशातील रिअल इस्टेट परिवर्तनावरील अहवालातून ही बाब समोर आली आहे.
याउलट, मुंबईच्या पश्चिम उपनगरांतील उपलब्ध घरसाठा २९ टक्क्यांनी, तर पश्चिमेकडील परिघीय भागांमध्ये तब्बल २४० टक्क्यांनी वाढला. मेट्रो कनेक्टिव्हिटी आणि मोठ्या टाउनशिप प्रकल्पांमुळे या भागांमध्ये नव्या घरांचा पुरवठा मोठ्या प्रमाणात वाढला आहे.
२०२१ ते २०२६च्या पहिल्या सहामाहीदरम्यान एमएमआरमध्ये ६,६६,५९८ निवासी युनिट्सचा पुरवठा झाला. या कालावधीत ६,९३,८५५ घरांची विक्री झाली असून, १,७३,१०३ घरांचा उपलब्ध साठा होता.
पायाभूत सुविधांमुळे विकासाचे विकेंद्रीकरण
एमएमआर प्रदेश सध्या संरचनात्मक बदलाच्या महत्त्वपूर्ण टप्प्यावर आहे. अभूतपूर्व पायाभूत सुविधा गुंतवणूक आणि विकासाचे विकेंद्रीकरण यामुळे या प्रदेशाला नवी दिशा मिळत आहे. पुढील टप्प्यातील विकास हा केवळ शहराच्या मध्यवर्ती भागातील दाटीवर नव्हे, तर पायाभूत सुविधांच्या आधारे होणाऱ्या प्रादेशिक विस्तारावर अवलंबून असेल,” असे ‘ॲॅनारॉक’ समूहाचे अध्यक्ष अनुज पुरी यांनी सांगितले.
पुढील चार-पाच वर्षांत पुरवठा वाढण्याची शक्यता
महाराष्ट्र सोसायटीज वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष रमेश प्रभू यांच्या मते, सध्याच्या मागणीच्या तुलनेत एमएमआरमधील घरांचा साठा पुरेसा आहे. मात्र, विशेषतः दक्षिण मुंबईत मोठ्या प्रमाणावर क्लस्टर पुनर्विकास प्रकल्प येत असल्याने पुढील चार-पाच वर्षांत घरांचा पुरवठा मागणीच्या तुलनेत वाढू शकतो. याचा परिणाम म्हणून घरांच्या किमती काही काळ स्थिर राहण्याची शक्यता आहे.
‘एमएमआर’मधील प्रमुख रिअल इस्टेट मायक्रो मार्केट
पश्चिम परिघीय उपनगरे : वसई, पालघर, मीरा रोड पूर्व, विरार, नायगाव पूर्व
मुंबई पश्चिम उपनगरे : मालाड पश्चिम, बोरीवली पूर्व व पश्चिम, अंधेरी पूर्व व पश्चिम
नवी मुंबई : पनवेल, तळोजा, खारघर, उलवे, वाशी
दक्षिण-मध्य मुंबई : भायखळा, परळ, माहीम, गिरगाव, वरळी
मध्य परिघीय उपनगरे : डोंबिवली, भिवंडी, कल्याण पश्चिम, कल्याण पूर्व, बदलापूर पूर्व
ठाणे : पोखरण रोड, माजिवडा, कोलशेत रोड, घोडबंदर रोड
मुंबई मध्य उपनगरे : चेंबूर, मुलुंड पश्चिम, भांडुप पश्चिम, विक्रोळी, घाटकोपर पूर्व