मुंबई : धर्मगुरू मग तो कुठल्याही समाजाचा असो, महापुरुष, राष्ट्रीय व्यक्ती यांची बदनामी करण्याचे प्रकार वाढले आहेत. यामुळे समाजात तेढ निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे असे प्रकार थांबविण्यासाठी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याच्या धर्तीवर कठोर शिक्षा करण्याची मागणी समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनी केली आहे. अशासकीय विधेयक महाराष्ट्र विधानसभा सचिवालयाकडे सादर केले आहे.
याबाबत शेख यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्र धर्मगुरू, ऐतिहासिक पुरुष आणि राष्ट्रीय व्यक्तिमत्त्वांचा अपमान (प्रतिबंध आणि शिक्षा) विधेयक २०२४ या शीर्षकाचे विधेयक सादर केले असून त्याचा उद्देश व्यक्तींना द्वेषपूर्ण किंवा आक्षेपार्ह विधाने करण्यापासून परावृत्त करण्यासाठी शिक्षेची तरतूद करणे हा आहे. समाज माध्यमांद्वारे व्यक्तींनी धर्मगुरू, महापुरुष आणि राष्ट्रीय व्यक्तिमत्वांविरुद्ध अपमानकारक किंवा आक्षेपार्ह विधाने करण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. या घटनांमुळे अनेकदा सार्वजनिक अशांतता, सामाजिक तणाव आणि काही वेळा हिंसक घटना घडल्या आहेत. यामुळे समाजात अशांतता निर्माण होते.