मुंबई : ताडदेव येथील विलिंग्डन व्ह्यू कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीतील रहिवाशांना हायकोर्टाने दिलासा देण्यास नकार दिला. न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि न्यायमूर्ती आरीफ डॉक्टर यांच्या खंडपीठाने आता आम्ही आणखी वेळ देऊ शकत नाही असे स्पष्ट करताना मानवतेच्या दृष्टीकोनातून त्यांची विनंती मान्य करून घरे रिकामी करून देण्यासाठी तीन आठवड्यांची मुदत दिली आहे. तीन आठवड्यांत जागा रिकामी करण्याची लेखी हमी दोन दिवसांत द्या, अन्यथा सदनिकेला सील ठोकले जाईल असा इशारा खंडपीठने दिला.
निवासी दाखला आणि अनिवार्य अग्निसुरक्षा नियमांचे पालन केल्याविना उभ्या राहिलेल्या या इमारतीच्या १७ ते ३४ मजल्यांना निवासी दाखलाच मिळालेला नाही. तरीही या मजल्यांवरील सगळ्या सदनिका विकल्या गेल्या असून, तेथे अनेक कुटुंब वास्तव्यास आहेत, याकडे न्यायालयाचे लक्ष वेधत याचिका दाखल केली. या याचिकेची गंभीर दाखल घेत खंडपीठाने ३४ मजली इमारतीला फक्त १६ मजल्यांपर्यंत ओसी मिळाली असून उर्वरित १७ ते ३४ मजले ओसी व्यतिरिक्त तसेच संपूर्ण इमारतीला फायर एनओसी नसल्याचे उघडकीस आल्याने बेकायदेशीर मजले खाली करून देण्याचे आदेश दिले होते.
सोसायटीच्या वकिलांचा युक्तिवाद
इमारतीच्या वरच्या १८ मजल्यांवर जवळपास २७ कुटुंबे राहत आहेत आणि त्यांना अल्पावधीतच पर्यायी निवासस्थान शोधणे कठीण आहे आणि म्हणून फ्लॅट रिकामे करण्यासाठी वेळ वाढवून द्यावा, अशी विनंती सोसायटीचे ज्येष्ठ वकील दिनयार मॅडोन यांनी केली.