मुंबई

ऐन तारुण्यात टीबीच्या विळख्यात!

किशोरवयीन मुलां-मुलींमध्ये टीबीचे प्रमाण वाढले; देशात दर एक लाखांपैकी २०० जणांना टीबीची लागण

स्वप्नील मिश्रा

एकीकडे कोरोनाने डोके वर काढल्यामुळे सर्वच जण चिंतेत असताना टीबीसारखा भयानक आजारही मागे जाण्यास तयार नाही. त्यातच गेल्या काही वर्षांत १३ ते १९ या किशोरवयीन गटात टीबी म्हणजेच क्षयरोगाचे प्रमाण झपाट्याने वाढल्याचे समोर आले आहे. कोरोना संसर्गानंतर आता युवा पिढीत टीबी वेगाने वाढताना दिसतो. या आजाराची लक्षणे अन् आजार बरा होण्यासाठी लागणारा कालावधीही बदलता आहे. खोकला हे टीबीचे प्रमुख लक्षण अनेक मुलांमध्ये ते दिसून येत नाही. फुप्फुसांव्यतिरिक्त शरीरातील इतर अवयवांवर टीबी हल्ला करत आहे. या आजारावर योग्य वेळी वैद्यकीय उपचार सुरू झाले नाहीत, तर तो वेगाने वाढतो. इतरांनाही संसर्ग देतो. देशात दर एक लाख जनतेपैकी २०० जणांना टीबीची लागण होत असल्याचे राष्ट्रीय पातळीवर करण्यात आलेल्या सर्वेक्षणातून उघडकीस आले आहे.

विशेषत: १४ वर्षांखालील मुलांना वैद्यकीय उपचारांकरीता प्रौढांसाठीच्या रुग्णालयांमध्ये प्रवेश दिला जात नाही. लहान मुलांना होणारा टीबी बरा करण्यासाठी आवश्यक वैद्यकीय व्यवस्था अनेक रुग्णालयांमध्ये नाही. मुलांना घेऊन पालक एका रुग्णालयातून दुसरीकडे फिरत राहतात. मुलांमधील टीबी वाढतो आहे, मात्र त्याला प्रतिबंध करण्यासाठी वैद्यकीय सुविधा केव्हा वाढणार, हा प्रश्न अनुत्तरित आहे.

केवळ फुप्फुसांमध्ये नाही, तर शरीराच्या इतर भागांमध्ये वाढणाऱ्या टीबीचे प्रमाण मुलांमध्ये ६५ टक्क्यांहून अधिक असल्याचे डॉक्टर सांगतात. मेंदू, हाडे, लिम्फनोड, पोटाचा टीबी हे प्रकारही आता दिसून येत आहेत. टीबीची लागण झालेल्या पालकांकडून मुलांमध्ये संसर्गित होणारा प्रादुर्भाव थांबवायचा असेल, तर पालकांचे समुपदेशन व योग्य वेळी विलगीकरणाची सुविधा मिळणे गरजेचे आहे. अनेक कुटुंबांमध्ये आजही हा आजार लपवून ठेवण्याकडे अधिक कल आहे. टीबी निर्मूलन कार्यक्रमामध्ये करण्यात येणाऱ्या आरोग्य सर्वेक्षणांत लहान, तसेच किशोरवयीन मुलींमध्ये मुलांपेक्षा टीबीची लागण अधिक असल्याचे दिसून येते.

गतवर्षी २.३३ लाख जणांना टीबी!

गतवर्षी झालेल्या राष्ट्रीय टीबी निर्मूलन कार्यक्रमाद्वारे २०२२मध्ये देशभरात २.३३ लाख जणांना टीबीची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. यापैकी १ लाख रुग्ण पूर्णपणे बरे झाले असून त्यांनी प्रायव्हेट डॉक्टरांकडून उपचार करून घेतल्याचे समजते. खासगी तसेच शासकीय रुग्णालयांमध्येही टीबीचे पूर्णपणे उपचार मिळावेत, यासाठी सर्वच जण प्रयत्नशील आहेत. मात्र अनेक जण शासकीय रुग्णालयात जाण्यापेक्षा खासगी डॉक्टरांनाच टीबीवरील उपचारांसाठी प्राधान्य देतात.

- डॉ. अनिरुद्ध कडू, जागतिक आरोग्य संघटनेचे (डब्ल्यूएचओ) सल्लागार

मुंबईतील स्थिती

वर्ष रुग्ण संख्या

२०२२ ५,७५८

२०२१ ५,९७८

२०२० ४,७७५

२०१९ ५,९९७

किशोरवयीन मुलींमध्ये संसर्ग अधिक

मुलांच्या तुलनेत किशोरवयीन मुलींमध्ये टीबीचा संसर्ग अधिक आहे. मागील पाच वर्षांत १५ वर्षांखालील मुलींमध्ये मुलांच्या तुलनेमध्ये या संसर्गाचे प्रमाण वाढलेले दिसते. २०१७मध्ये एकूण निदान झालेल्या टीबी रुग्णांपैकी ८४५ मुले व १,५४१ मुली होत्या. २०१८मध्ये १,५७८ मुलांची, तर २,८०८ मुलींची नोंद झाली. त्यापुढील वर्षात २,८८६ मुली, १,५७६ मुलांना टीबीची लागण झाली. करोना संसर्गाच्या कालावधीमध्ये म्हणजे २०२०मध्ये १,१६६ मुले, २,३८३ मुली टीबीग्रस्त होत्या. हे प्रमाण आता वाढले असून ३,७४१ किशोरवयीन मुली या आजाराच्या विळख्यात आहेत.

मविआचा महानिक्काल, महायुतीच लाडकी; महायुतीला २३६ जागा, तर मविआला केवळ ४९ जागा

‘लाडकी बहीण’ योजना ठरली गेमचेंजर; देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार

झारखंडमध्ये ‘जेएमएम’च्या नेतृत्वाखालील सरकार; इंडिया आघाडीकडे बहुमत, भाजप दुसऱ्या क्रमांकावर

‘सिंह’ म्हातारा झालाय!

ठाकरेंचे वलय संपले का?