मुंबई: कागदावरची शिवसेना त्यांनी संपवली, पण जमिनीवरची शिवसेना ते कधीच संपवू शकत नाहीत. कारण ते कधी जमिनीवर राहू शकत नाही. तसेच लढाई अद्याप संपलेली नाही, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी स्पष्ट केले.
मुंबईतील शिवसेना ठाकरे गटाच्या नवनिर्वाचित नगरसेवकांनी शनिवारी 'मातोश्री'वर उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटासह भाजपवर हल्लाबोल केला.
ते म्हणाले की, यशाचे मानकरी तुम्ही सगळे आहात. आम्ही फक्त निमित्त मात्र आहोत. जो निकाल या सगळ्या परिस्थितीमध्ये लागला तो अभिमानास्पद आहे. त्यांनी साम, दाम, दंड, भेदसह सर्व यंत्रणांचा दुरुपयोग केला. गद्दार निघून गेले मात्र ते निष्ठा विकत घेऊ शकले नाहीत. मी सगळ्यांना मानाचा मुजरा करतो आणि आता आपली जबाबदारी वाढली आहे, असे ते म्हणाले.
रिकाम्या खुर्च्या मतदान कशा करु शकतात ?
दरम्यान, दादरच्या सेना भवनात झालेल्या पत्रकार परिषदेत ठाकरे म्हणाले की, लोकसभा, विधानसभा निवडणुकीत बघितले, आता मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीतही सत्ताधाऱ्यांच्या शिवाजी पार्कमधील सभेत खुर्च्या रिकाम्या असल्याचे सोशल मीडियावर बघितले. त्यामुळे या रिकाम्या खुर्च्या मतदान कशा करु शकतात, असा सवाल त्यांनी केला.
निवडणुकीत घाणेरड्या पद्धतीचा वापर
ते म्हणाले की, या निवडणुका फार विचित्र किंवा अत्यंत घाणेरड्या पद्धतीने सत्ताधारी पक्षाकडून लढवल्या गेल्या. जणू काही प्रत्येक निवडणूक म्हणजे अगदी त्यांच्या जीवन-मरणाचा प्रश्न आहे. साम-दाम-दंड-भेद याच्या पलिकडे जाऊन त्यांनी सर्व यंत्रणांचा वापर केला. पैशांची लालुच, आमिष दाखवले, आमच्या काही शिवसैनिकांना तडीपार करण्याच्या नोटीसा दिल्या, काही जणांना अटक झाली, काही ठिकाणी दंगली भडकवण्याचे प्रयत्न झाले. ठाणे आणि कल्याण-डोंबिवली येथील आमच्या काही उमेदवारांना पैशाची आमिषे दाखवली. काही ठिकाणी जबरदस्तीने उमेदवारी मागे घ्यायला लावली. मात्र, या सगळ्या गुंडागर्दीला न घाबरता ज्या-ज्या उमेदवारांनी लढत दिली आणि ज्या-ज्या मतदारांनी निर्भिडपणे मतदान केले. हे सगळेजण खरोखरच लोकशाहीचे रक्षक आहेत. मुंबईत आमचा महापौर होणार आणि व्हावा अशी आमची इच्छा होतीच व आजही आहे. परंतु तो आकडा आम्ही आज तरी गाठू शकलो नाही. पण त्यांच्या घाणेरड्या राजकारणाला उत्तर देऊन जो काही निकाल लागला आहे किंवा जे काही यश शिवशक्तीने मिळवले आहे, त्या निकालाने सत्ताधारी पक्षाला घाम फुटला आहे, असे त्यांनी सांगितले.
'जेव्हा मी राज्यभर फिरत होतो, त्यावेळी कोणत्याही सोयीसुविधा आपण देऊ शकलो नाही. आपल्याकडे तन, मन आहे तर त्यांच्याकडे फक्त धन आहे. मात्र, ही शक्ती अशीच बांधून ठेवा, पुढच्या पिढ्यांनासुद्धा तुमचा अभिमान वाटेल, असे ठाकरे म्हणाले.
देवाच्या मनात असल्यास महापौरही होईल
आपला महापौर व्हायला पाहिजे हे तर स्वप्न आहे. देवाच्या मनात असेल तर तेही होईल, असे सूचक विधान उद्धव ठाकरे यांनी केले. गद्दारी करून त्यांनी विजय मिळवला आहे, तो मुंबई गहाण ठेवण्यासाठीच असल्याचा हल्लाबोल त्यांनी केला. या पापाला मराठी माणूस कधीच क्षमा करणार नाही. मात्र, तुम्ही अभिमानाने लढला, तुम्ही निष्ठेने लढला त्यामुळे तुमचा मला अभिमान असल्याचे त्यांनी नमूद केले.
सत्ता व धनशक्तीचा मुकाबला केला - राज ठाकरे
सत्ता व धनशक्तीविरुद्ध शिवशक्ती अशी ही लढाई होती. तरीही दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी चांगली झुंज दिली. त्यांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे, असे प्रतिपादन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले. मुंबई मनपा निवडणुकीनंतर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये प्रथम मनसे आणि शिवसेनेच्या निवडून आलेल्या सर्व नगरसेवकांचे अभिनंदन केले. ही निवडणूक सोपी नव्हती, असे असे ते म्हणाले. मनसेला अपेक्षित यश न मिळाल्याचे दुःख असल्याचे राज ठाकरेंनी सांगितले. मात्र, त्यामुळे खचून जाणार नाही, असे ते म्हणाले. निवडून आलेले मनसे नगरसेवक स्थानिक सत्ताधाऱ्यांना पुरून उरतील. मराठी माणसाविरोधात काही घडले तर त्यांना जाब विचारतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
महायुतीचाच महापौर करायचा हे देवानेच ठरवलेय - फडणवीस
'आपला महापौर व्हायला पाहिजे हे आपले स्वप्न आहे. बघू देवाच्या मनात असेल तर तेही होईल', असे उद्धव ठाकरे यांनी म्हटल्याबाबत विचारले असता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, देवाच्या म्हणजे माझ्या की वरच्या देवाच्या? असा प्रतिप्रश्न करत, मला 'देवा' म्हणतात म्हणून विचारतो, अशी मिश्कील टिप्पणी केली. मात्र, वरच्या देवानेच ठरवलंय की महायुतीचाच महापौर करायचा आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.