भंडारा-गोंदिया जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी निवडणुकीनंतर काँग्रेस आणि राष्ट्रावादी काँग्रेसमधील वाढलेला वाद अद्यापही कमी होण्याची चिन्हे नाहीत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसविरोधात पक्षश्रेष्ठी सोनिया गांधी यांच्याकडे तक्रार करून महाविकास आघाडीतील धुसफुस पुन्हा एकदा चव्हाट्यावर आणली आहे.
“भंडारा, गोंदिया जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या अध्यक्ष आणि सभापतीपदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचा लिखीत करार मोडून राष्ट्रवादीने भाजपसोबत जाऊन सत्ता स्थापन केली, ही दगाबाजीच आहे,” असा गंभीर आरोप नाना पटोले यांनी केला होता. तसेच याला पाठीत खंजीर खुपसणे नाही तर दुसरे काय म्हणायचे? असा सवालही पटोले यांनी केला होता.
“भंडारा, गोंदिया जिल्हा परिषद निवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन सत्ता स्थापन करण्याचे ठरवले होते. ३० जानेवारी रोजी या बाबतचे पत्र तिन्ही पक्षांनी काढले होते. त्यावर माझ्यासह, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि शिवसेनेकडून सुभाष देसाई यांनी स्वाक्षऱ्या केल्या होत्या.” मात्र असे असतानाही राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी आम्हाला प्रतिसाद दिला नाही. शेवटपर्यंत आम्हाला ताटकळत ठेवले आणि ऐनवेळी भाजपसोबत जाऊन पंचायत समित्यांमध्ये आणि गोंदिया जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन केली,” असा पटोले यांनी आरोप केला.