मुंबई

शिवाजी पार्कच्या धुळीवर लवकरच तोडगा काढणार - आ. सावंत; BMC च्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले 

दादर येथील छत्रपती शिवाजी पार्क येथील मैदानात उडणारी धूळ आणि प्रदूषण यावरून सध्या राजकारणात कलगीतुरा सुरू आहे.

Swapnil S

मुंबई : दादर येथील छत्रपती शिवाजी पार्क येथील मैदानात उडणारी धूळ आणि प्रदूषण यावरून सध्या राजकारणात कलगीतुरा सुरू आहे. शिवसेनेच्या शिंदेसेना आणि उद्धव सेना या दोन्ही गटाने परस्परांवर आरोप केले असतानाच मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे. मात्र आता स्थानिक आमदार महेश सावंत यांनी पालिकेच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले असून लवकरच धुळीवर तोडगा काढणार असल्याचे आश्वासन सावंत त्यांनी दिले आहे.

शिवाजी पार्क येथील धुळीमुळे परिसरातील नागरिक तसेच या ठिकाणी बाहेरून येणारे नागरिक, लहान मुले, वयोवृद्ध त्रस्त झाले आहेत. या संदर्भात मनसेने पालिकेच्या जी दक्षिण विभागावर मोर्चा काढल्यानंतर उद्धव सेनेच्या स्थानिक आमदारांनी पालिका अधिकाऱ्यांसोबत मैदानाची पाहणी केली. माजी आमदारावर या संदर्भात सावंत यांनी आरोप केल्यानंतर माजी आमदार सरवणकर यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांना घेऊन मैदानाची तपासणी केली. यावेळी कदम यांनी मैदानातील माती उत्तम दर्जाची नसल्याचे सांगून आदित्य ठाकरे आणि उद्धव सेनेकडे बोट दाखवले.

मैदानातील धूळ कमी व्हावी यासाठी अधिक उपाययोजना करण्याची गरज स्थानिकांकडून व्यक्त केली जात आहे. या संदर्भात आपण पालिका उपायुक्त आणि विभाग अधिकाऱ्यांना पत्र पाठवले असून त्यांच्याशी चर्चा केली आहे. आता जनतेच्या आरोग्याकडे आणि समस्येकडेच लक्ष देऊन तोडगा काढणार असल्याचे आ. महेश सावंत यांनी सांगितले.

मीनाताई ठाकरे फूल मंडई असा फलक लावणार 

दादर पश्चिमेच्या मीनाताई ठाकरे फूल मंडईबाहेर असलेले फलक पालिका अधिकाऱ्यांनी काढून टाकण्याचा निर्णय घेतला. यावेळी पालिका अधिकाऱ्यांनी केवळ शिवसेना ठाकरे गटाचा फलक काढला. मात्र मनसेचा फलक काढला नाही, याबाबत आपण पालिका अधिकाऱ्यांना जाब विचारला. जर फलक काढायचे असतील तर सर्वांचेच काढा, असे आपण पालिका अधिकाऱ्यांना सांगितले. त्यानंतर फक्त मीनाताई ठाकरे फूल मंडई असा फलक लावण्याचे ठरले आहे, असे आ. सावंत यांनी सांगितले.

दादर फूल मंडई हा विभाग सावंत यांच्या मतदारसंघात येत नाही, मग कशासाठी ते या ठिकाणी येऊन लुडबुड करतात? मराठी व्यापाऱ्यांकडून त्यांना हप्ते मिळत नाहीत म्हणून हा त्यांचा हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न आहे.

समाधान सरवणकर, माजी नगरसेवक, शिंदे सेना.

कोकणवासीयांना यंदाही ‘बाप्पा’ पावणार; कोकणात जाणाऱ्यांना टोल माफी

श्रावणात पावसाची १५ दिवस सुट्टी; १५ ऑगस्टनंतरच पावसाची बॅटिंग, भारतीय हवामान विभागाची माहिती

मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय; कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर थेट नियंत्रणाचा मार्ग मोकळा

ऑपरेशन सिंदूरबाबत आक्षेपार्ह मजकूर नडला; FIR रद्द करण्यास हायकोर्टाचा नकार

IND vs ENG : "तू आम्हाला शिकवू नकोस"; खेळपट्टी पाहण्यास अटकाव करणाऱ्या ओव्हलच्या पिच क्युरेटरवर संतापला गौतम गंभीर | Video