मुंबई

पालिकेची गंगाजळी घटली; वर्षभरात ८ हजार कोटींनी घसरण

३१ मार्च २०२२ रोजी मुदत ठेवींची रक्कम ही ९१ हजार ६९० कोटी रुपये होती. जून २०२३ रोजी मुदतठेवी ८६ हजार ४६७ कोटी रुपये होत्या.

Swapnil S

मुंबई : मुंबई महापालिकेच्या विविध बँकांमध्ये कोट्यवधी रुपयांच्या ठेवी असून सत्ताधाऱ्यांचा डोळा पालिकेच्या ठेवींवर, असा आरोप विरोधकांकडून होत आहे. त्यातच आता गेल्या वर्षभरात तब्बल ८ हजार कोटींच्या ठेवी घटल्या आहेत. दरम्यान, ३१ मार्च २०२२ रोजी मुदत ठेवींची रक्कम ही ९१ हजार ६९० कोटी रुपये होती. जून २०२३ रोजी मुदतठेवी ८६ हजार ४६७ कोटी रुपये होत्या. त्या नोव्हेंबर २०२३च्या अखेरपर्यंत ८४ हजार ६१५ कोटींवर आल्याने ठेवींमध्ये झपाट्याने घट होत असल्याचे समोर आले आहे.

७ मार्च २०२२ रोजी नगरसेवकांचा कार्यकाळ संपुष्टात आला आणि मुंबई महापालिकेत ८ मार्चपासून प्रशासकीय राज्य आले आहे. ३१ मार्च २०२२ रोजी प्रशासक राजवटीत मुदत ठेवींची रक्कम ९१ हजार ६९० कोटी रुपये होती. परंतु ३० जून २०२३ रोजी ठेवी ८६ हजार ४६७ कोटींवर पोहोचली होती. राज्यातील सत्ताधारी पक्षाचा डोळा पालिकेच्या तिजोरीवर असून ठेवीतून खर्च केला जात असल्याचा आरोप विरोधकांनी प्रशासकावर केला आहे. निधीवाटपात दुजाभाव केल्याचा आरोप करत मुदत ठेवी मोडल्याचा आरोप करत ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी प्रशासकाला या गंभीर प्रश्नी जाब विचारला होता. परंतु प्रशासक म्हणून डॉ. इक्बालसिंह चहल यांनी आदित्य ठाकरेंचे आरोप फेटाळले होते. पालिकेच्या विविध बँकांमध्ये ठेवी असून त्याची माहिती जाहीर केली आहे. नोव्हेंबर २०२३ पर्यंत बँकेतील मुदतठेवींच्या ताळेबंदमध्ये नोव्हेंबर २०२३ पर्यंत एकूण ८४ हजार ६१५ कोटी रुपयांचा निधी असल्याचे नमूद केले आहे. नोव्हेंबर २०२३ मध्ये अर्थसंकल्प अ, ई आणि ग या बाबतीतील मुदतठेवीतील आरंभीची एकूण गुंतवणूक ८५ हजार ३७० कोटी एवढी होती. त्यापैकी ७ हजार ४८९ कोटी रकमेच्या मुदतठेवींची मुदत (मॅच्युअर्ड) पूर्ण झाली आहे. त्यामुळे अर्थसंकल्प अ, ई आणि ग ची नोव्हेंबर २०२३ मध्ये गुंतविण्यात आलेल्या एकूण रक्कम ६ हजार ७३४ कोटी वजा मॅच्युअर्ड मुदतठेवी ७ हजार ४८९ कोटी या प्रमाणे नोव्हेंबर २०२३ मधील निव्वळ गुंतवणूक ७५५.०३ कोटी एवढी आहे. त्यानुसार ३० नोव्हेंबर २०२३ रोजीची मुदत ठेवीतील अखेरची गुंतवणूक ८४ हजार ६१५ कोटी असल्याचे म्हटले आहे.

६ हजार ७३४ कोटीची गुंतवणूक

नोव्हेंबर २०२३ मध्ये ६ हजार ७३४ कोटीची गुंतवणूक मुदतठेवीत करण्यात आली आहे. ३६६ ते ५५८ दिवसांकरिता विविध बँकामध्ये ही गुंतवणूक केली असून त्यावर ७.६० ते ७.६८ टक्के दराने ५७८ कोटी रुपये व्याज मिळणार आहे.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी