मुंबई : घाटकोपर येथील रमाबाई आंबेडकर नगर व कामराज नगरचा पुनर्विकास झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (एसआरए) आणि एमएमआरडीएने संयुक्त भागीदारी अंतर्गत हाती घेतला आहे. हा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने केलेल्या प्रयत्नांची यशस्वी फलश्रुती झाली. या योजनेच्या पहिला टप्प्यामधील अंदाजे ४००० झोपडीधारकांपैकी सुमारे ३२०० झोपडीधारकांना धनादेश वाटपाची कारवाई एसआरएने पूर्ण केली आहे. उर्वरित रहिवाशांना धनादेश वाटप करून मे अखेरीस हा भूखंड पुनर्विकासाठी एमएमआरडीएकडे हस्तांतरित करण्यात येणार आहे.
झोपडपट्टीमधील लोकांना हक्काची घरे मिळावी व त्यांचे पुनर्वसन व्हावे यासाठी एसआरए व एमएमआरडीए बरोबर संयुक्त करार करून झोपडपट्टी पुनर्वसन योजना अंमलबजावणीचा शासन निर्णय ३१ जुलै २०२४ रोजी झाला आहे. एसआरएचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाअंतर्गत जलद गतीने पुनर्विकास करण्यासाठी येथील १६००० लोकांचे बायोमेट्रिक सर्वेक्षण पूर्ण करून झोपडी धारकांची पात्रता निश्चिती केवळ सहा महिन्यात पूर्ण केलेली आहे. साधारणतः अशाच प्रकारे काम करण्यासाठी किमान एक ते दीड वर्षाचा कालावधी लागत असतो. मात्र या ठिकाणी पात्रता लवकरात लवकर निश्चित करून प्रकल्प सुरू होण्याच्या अनुषंगाने झोपूप्रामार्फत १० सक्षम प्राधिकार यांची नियुक्ती करण्यात आलेली होती. त्यामुळे पात्रता निश्चिती लवकर पूर्ण झाली आहे.
झोपडपट्टीधारकांसोबत एग्रीमेंट करणे, झोपडीधारकांना भाड्यापोटी आगाऊ चेक देणे, त्यांची झोपडी तोडण्यापूर्वी त्यांना पर्यायी व्यवस्था मिळवून देण्यासाठी मदत करणे, पर्यायी व्यवस्था झाल्यावर सामानाची न करण्यासाठी त्यांना साह्य करणे इत्यादी महत्त्वपूर्ण कामे एसआरए अधिकारी व कर्मचारी गेले चार महिने करीत आहेत. सदर योजना अंदाजे मे २०२५ अखेरपर्यंत भूखंड पूर्ण मोकळा करून एमएमआरडीए यांच्याकडे हस्तांतरित करण्याचा मानस एसआरए अधिकाऱ्यांनी ठेवला आहे, असल्याचे सांगण्यात आले.
त्यानंतर एमएमआरडीएमार्फत पुनर्वासनाचे काम हाती घेण्यात येणार असल्याचे नियोजित आहे. अशाप्रकारे मुंबईला झोपडपट्टी मुक्त करण्यासाठी केवळ खासगी विकासावर अवलंबून न राहता एसआरएने पुढाकार घेऊन विकासकाच्या भूमिकेतील एमएमआरडीएच्या भागीदारीने झोपडीधारकांचे हक्काचे घर मिळवून देण्याचा पथदर्शी प्रकल्प हाती घेऊन एक नवे यशस्वी पाऊल पुढे टाकले आहे.
दोन वर्षाचे आगाऊ भाडे, एक वर्षाचे पीडीसी
एसआरएचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेंद्र कल्याणकर यांनी झोपडपट्टीधारकांचे प्रबोधन व जागृती व्हावी यासाठी वेळोवेळी स्थानिक लोकांच्या बैठका घेतल्या. सर्व सोसायट्यांच्या कमिटी मेंबर बरोबर सुसंवाद साधला. या योजनेसाठी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने झोपडपट्टी धारकांना दोन वर्षाचे भाडे आगाऊ व एक वर्षाचे भाडे पोस्ट डेटेड चेक ने देण्यात आले आहे. चेक वाटपासाठी एसआरएने वीस ऑडिटरची स्पेशल टीम बनवली आहे. यासाठी एसआरएने ५०० कोटी रुपये उपलब्ध करून दिले आहेत.