मुंबई

सत्ताधारी पण हेच, विरोधक पण हेच! जगात असे राजकारण कुठे चालत नसेल : राज ठाकरेंची टीका

राज्यातील टोलवर ९० कॅमेरे लागले आहेत

प्रतिनिधी

मुंबई : राज्यात सगळी विचित्र आणि घाणेरडी परिस्थिती झाली आहे. सत्तेत कोण आहे, शिवसेना, विरोधी पक्षात कोण आहे शिवसेना. सत्तेत आहे राष्ट्रवादी काँग्रेस, त्यांचाच एक गट बाहेर आहे, असं राजकारण कधी पाहिलं नाही. जगाच्या पाठीवर महाराष्ट्र हे एकमेव राज्य असेल, दोन पक्ष, त्यातील अर्धा पक्ष सत्तेत, दुसरा बाहेर. विशेष म्हणजे नाव तेच. अशी परिस्थिती जगात तरी पाहिली का. हे राज्य म्हणायचे की काय म्हणायचे असे सवाल करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यातील सध्याच्या राजकारणाची खिल्ली उडवली. राज्यातील टोलवर ९० कॅमेरे लागले आहेत. आता सगळे रेकॉर्डच होणार आहे. योग्य वेळी मनसेच्या इंजिनाची वाफ बाहेर काढेन. नाही चटके बसले तर याद राखा, असा इशाराही त्यांनी दिला.

दादर येथील स्वा.सावरकर स्मारक येथे पदाधिकारी मेळाव्याला संबोधित करताना राज ठाकरे बोलत होते. पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना राज्यातील राजकारण, टोल, पदवीधर-शिक्षक मतदारसंघ तसेच चिपळूण येथे कोसळलेला पूल आदी गोष्टींवरून त्यांनी टीकास्त्र सोडले. टोलचा विषय आपण हाती घेतला आहे. टोलवरून रोज किती गाड्या जातात, हे कळतच नाही. रोज हजार गाड्या जातात. टोलवर गाड्या मात्र तेवढयाच म्हटले आता रेकार्डच करून टाकूया. टोलवर आता ९० कॅमेरे लावले असल्याचेही राज ठाकरे म्हणाले.

‘‘कोकणात चिपळूणमध्ये पूल पडला. मी आधीच म्हणालो होतो, पूल आणि रस्त्यांचे ऑडिट झाले पाहिजे. ज्यांच्या हातून पूल पडत आहेत, त्यांनाच हजारो कोटींची कामे दिली जात आहेत. आपण मात्र हताशपणे पाहत बसायचे. भीती नावाची गोष्ट राहिली नाही. कोणालाच राग येत नाही. निवडणूका कधी लागणार, हे देखील विचारले जात नाही. आतमध्ये या गोष्टी धुमसतात ना, त्या योग्यवेळी बाहेर काढेन. आपल्या इंजिनाची वाफ बाहेर काढेन. नाही चटके बसले तर पहा, असा इशारा त्यांनी दिला.

पदवीधरच्या फॉर्मवर सही किंवा अंगठा

‘‘भारत काय, हिंदुस्तान काय, इंडिया काय जगात एकमेव आपला देश असेल जिथे अशी लोकशाही चालते,’’ असे सांगून राज ठाकरे म्हणाले, ‘‘मला एकदा प्रमोद नवलकरांनी पदवीधर मतदारसंघाचा फॉर्म दाखवला होता. त्यावर खाली होते सही किंवा अंगठा. म्हणजे उमेदवार हा पदवीधर असला पाहिजे, याची गरज नाही. पण मतदार हा पदवीधरच असला पाहिजे. शिक्षक मतदारसंघातही उमेदवार शिक्षक पाहिजे, असे काही नाही. असे असले तरी आपल्या पक्षाचे फॉर्म भरून घ्या, असा आदेशही राज ठाकरे यांनी दिला.

मुंबईसह राज्यातील कबुतरखाने बंद होणार; उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती

बाळ चोरीला गेल्यास रुग्णालयाची नोंदणी रद्द होणार; राज्य सरकारचा निर्णय

आता २४ तास वाळू वाहतूक; GPS, CCTV बसवणे बंधनकारक; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सभागृहात घोषणा

सरकारी यंत्रणा शेतकऱ्यांची मारेकरी! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राहुल गांधी आक्रमक

घरांच्या किमती वाढल्याची राज्य सरकारची कबुली