मुंबई : उत्तरेकडून वाहणाऱ्या वाऱ्यामुळे मुंबईसह ठाणे परिसरातील तापमानात वाढ होत आहे. मुंबईत सूर्य आग ओकत आहे. गेले दोन दिवस मुंबईसह ठाणे, रायगडचे तापमान ३८ ते ४० अंश सेल्सिअसवर गेल्याने मुंबईकरांसह ठाणेकरांच्या अंगाची लाही लाही झाली. पुढील दोन ते तीन दिवस मुंबई परिसरातील पारा चढाच राहणार आहे. दरम्यान, मुंबईतील तापमानात वाढ होत असून दुपारी १२ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत गरज असेल तरच घराबाहेर पडा, असे आवाहन कुलाबा हवामान विभागाच्या शास्त्रज्ञ सुषमा नायर यांनी केले आहे.
डोक्यावर आग ओकणारा सूर्य, तापलेले रस्ते, लोकलमध्ये जाणवणाऱ्या उष्णतेच्या झळांनी मुंबईसह नवी मुंबई, ठाणे, रायगडमधील नागरिक हैराण झाले आहेत. मागील दोन दिवसांपासून उष्णता वाढल्याने उन्हाचे चटके बसत आहेत. सोमवारी मुंबईत ३८ अंश सेल्सिअसपर्यंत तापमान होते. दुसऱ्या दिवशी मंगळवारी यात आणखी वाढ होत पारा ३९.७ अंश सेल्सिअसवर पोहचला. ठाण्यात तर उच्चांकी ४२ अंश सेल्सिअसपर्यंत तापमान वाढले. त्यामुळे मुंबई, नवी मुंबई, ठाणे, रायगड येथील नागरिक उष्णतेच्या लाटेने हैराण झाले. ही स्थिती आणखी तीन दिवस कायम राहणार असल्याची माहिती भारतीय हवामान विभागाने दिली.
सकाळी १० वाजल्यापासूनच वातावरणात उष्णता वाढली. उष्णतेने रस्ते, रेल्वे, बसेस तापल्याने उन्हाचे चटके सहन करीत अनेकांनी नोकरी, व्यवसायाचे ठिकाण गाठले. हवामान विभागाने सोमवार, मंगळवारी मुंबई, ठाणे, रायगडला उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला होता. पुढील दोन दिवस म्हणजे ४८ तास उष्णतेचा कहर कायम राहणार आहे. १९ एप्रिलनंतर ही स्थिती हळूहळू कमी होईल, असे हवामान विभागाकडून सांगण्यात आले.