मुंबई

गर्डरचे वजन वाढले, सल्लागाराने भाव खाल्ला; विद्याविहार स्थानकातील पुलाच्या कामांत सल्ला महागला,दोन कोटींचा सल्ला चार कोटींवर

विद्याविहार स्थानकातील उड्डाणपुलाच्या पर्यवेक्षणाचे काम व ६०० मेट्रिक टनने गर्डरचे वजन वाढल्याने सल्लागार मे. राइट्स लिमिटेड कंपनीच्या सल्लागार शुल्कात तब्बल दोन कोटी ५३ लाखांची वाढ झाली आहे.

Swapnil S

मुंबई : पूर्व व पश्चिमेला जोडण्यासाठी विद्याविहार स्थानकांत गर्डर लाँच करण्यात आला आहे. मात्र गर्डरच्या वजनात वाढ झाल्याने सल्लागार कंपनीच्या शुल्कात वाढ झाली आहे. विद्याविहार स्थानकातील उड्डाणपुलाच्या पर्यवेक्षणाचे काम व ६०० मेट्रिक टनने गर्डरचे वजन वाढल्याने सल्लागार मे. राइट्स लिमिटेड कंपनीच्या सल्लागार शुल्कात तब्बल दोन कोटी ५३ लाखांची वाढ झाली आहे. त्यामुळे मूळ दोन कोटी १० लाखांचे शुल्क आता चार कोटी ६३ लाखांवर पोहोचले आहे.

पूर्वेकडून पश्चिमेला जाण्यासाठी विद्याविहार, घाटकोपर, चेंबूरकरांना वळसा घालून जावे लागते. यावर उपाय म्हणून विद्याविहार स्थानकाजवळ पूर्वेकडील रामचंद्र चेंबूरकर आणि पश्चिमेकडील लालबहादूर शास्त्री मार्ग यांना जोडण्यासाठी नवा उड्डाणपूल बांधण्यात येत आहे. १२.५ मीटर रूंद आणि १०० मीटर (३२८ फूट) लांबीचा हा पूल असणार आहे. दोन पिलरवर हा पूल सलग बांधण्यात येणार आहे. या दरम्यान एकही पिलर नसेल. अशा प्रकारचा पहिलाच प्रयोग मुंबईत केला जात आहे. लांबीमुळे हा पूल आशियातील सर्वात मोठा पूल ठरणार आहे. पुलासाठी स्टेनलेस स्टिलचा वापर करण्यात आला आहे. पुलाची बांधणी जागेवरच सुरू असून त्याचे आवश्यक भाग तयार करण्यात आले आहेत. नोव्हेंबर २०२३ मध्ये पुलाचा दुसरा गर्डर लाँच करण्यात आला आहे.

या पुलाच्या कामासाठी मे. राइट्स लिमिटेड कंपनीची २०१८ मध्ये सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. राइट्स लि. यांना ९ डिसेंबर २०२० ते ८ डिसेंबर २०२१ पर्यंत नियुक्त करण्यात आले होते. दरम्यानच्या काळात कोरोना महामारीमुळे रेल्वे प्रशासनामार्फत पूल बांधणीस आवश्यक असलेल्या परवानग्या मिळण्यास विलंब झाला. त्यामुळे तसेच रेल्वे प्रशासनाकडून रेल्वे रुळावर बसविण्यात येणाऱ्या गर्डरच्या आराखड्यात वेळोवेळी झालेल्या बदलानुसार आराखड्याच्या अंतिम मंजुरीस विलंब झाला. त्यामुळे राइट्स यांचा सेवा पुरविण्याचा कालावधी दोन वेळेस वाढविण्यात आला. प्रथमतः ९ डिसेंबर २०२१ ते ८ डिसेंबर २०२२ आणि दुसऱ्यांदा ९ डिसेंबर २०२२ ते ३० नोव्हेंबरपर्यंत वाढविण्यात आला आहे. आधी निश्चित केल्यानुसार गर्डरचे वजन १५०० मेट्रिक टन होते, ते २१०० मेट्रिक टन झाले. म्हणजे गर्डरचे वजन ६०० मेट्रिक टनने वाढले आहे. त्यामुळे राइट्स यांच्याशी करण्यात आलेल्या करारानुसार त्यांना द्यावयाचे कार्यस्थळावरील कामाचे २१ महिने २३ दिवसांचे पर्यवेक्षण शुल्क व गर्डरच्या अतिरिक्त वाढलेल्या वजनासाठी फेब्रिकेशनच्या कामाचे पर्यवेक्षण शुल्क वाढवून द्यावे लागले आहे, असे पालिकेने याबाबतच्या प्रस्तावात म्हटले आहे.

असा वाढला सल्ला!

  • मूळ सल्ला : दोन कोटी १० लाख

  • नवीन वाढ : दोन कोटी ५३ लाख

  • एकूण सल्ला : चार कोटी ६३ लाख

  • उड्डाणपुलाची माहिती

  • लालबहादूर शास्त्री मार्ग व रामचंद्र चेंबूरकर मार्ग यांना जोडणारा हा उड्डाणपूल दोन मार्गिकांचा आहे.

  • एकूण ६५० मीटर लांबीच्या या प्रकल्पात रेल्वे रुळांवर १०० मीटर पूल, तर पूर्व बाजूस २२० मीटर आणि पश्चिम बाजूला ३३० मीटर पोहोच मार्ग बांधण्यात येत आहे.

  • रेल्वे रुळांच्यावर असलेल्या पुलाची रुंदी २४.३० मीटर राहणार आहे. यात दोन्ही बाजूला प्रत्येकी २ मीटरचे पदपथ समाविष्ट आहेत.

  • पुलाचा पोहोच मार्ग हा एकूण १७.५० मीटर रुंदीचा असेल. त्यात प्रत्येकी १ मीटरचा पदपथ दोन्ही बाजूस समाविष्ट असेल.

  • उड्डाणपुलाचा अंदाजित खर्च सुमारे १७८ कोटी रुपये आहे.

  • रेल्वे रुळावरील मुख्य उड्डाणपुलाचा खर्च सुमारे १०० कोटी रुपये, तर पोहोच मार्ग आणि इतर कामे मिळून ७८ कोटी रुपये इतका खर्च आहे.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी