मुंबई : हुक्का पार्लरमध्ये तंबाखूजन्य पदार्थांची विक्री होत असल्याचे निदर्शनास येताच त्या हुक्का पार्लरचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्यात येईल, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला.
राज्यात हुक्का ही तरुणाईची स्टाईल झाली असून हक्का पार्लरमध्ये तंबाखू व्यतिरिक्त सेवन होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे ज्या भागात हुक्का पार्लर आहे त्याचा पर्दाफाश पोलिसाव्यतिरिक्त अन्य कोणी केला तर संबंधित पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला. विधानसभा सदस्य नाना पटोले, संजय केळकर, सुधीर मुनगंटीवार आदी सदस्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नोत्तराच्या तासात फडणवीस यांनी उत्तर दिले.
हुक्का पार्लरच्या आड तंबाखूजन्य पदार्थांची विक्री होत असल्याचे निदर्शनास आले आहे. पुण्यातच नव्हे तर राज्यातील प्रमुख शहरांत हुक्का पार्लरचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. हुक्का पार्लरमुक्त ठाणे यासाठी तीन वर्षांपूर्वी मोहीम सुरू केली. मोहीमेला काहीसे यश आले. मात्र आजही ४० टक्के हुक्का पार्लर सुरु आहे, असे विधानसभा सदस्य संजय केळकर यांनी निदर्शनास आणून दिले. दरम्यान, हुक्का पार्लरमध्ये अमली पदार्थांची विक्री होते तर गुन्हा दाखल केला जातो आणि तीन वर्षांची शिक्षा आहे.
तरी हुक्का पार्लरच्या आड तंबाखूजन्य पदार्थ विक्री करणाऱ्यांवर कारवाईसाठी ठाण्यासह संपूर्ण राज्यात विशेष मोहीम हाती घेत हुक्का पार्लरवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात येतील, असे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी यावेळी सांगितले.
अशी होणार कारवाई
पहिल्यांदा निदर्शनास आले तर पार्लर चालकांना समज देणार
दुसऱ्यांदा निदर्शनास आले तर सहा महिन्यांसाठी परवाना रद्द करणार
तिसऱ्यांदा निदर्शनास आले तर कायमस्वरुपी परवाना रद्द होणार
हुक्का पार्लरच्या आडून अमली पदार्थांची विक्री
हुक्का पार्लरमध्ये तंबाखूजन्य पदार्थ विक्री होत असल्याचे निदर्शनास आल्याने २००३ मध्ये कायद्याची तरतूद करून हुक्का पार्लरवर बंदी घातली आहे. मात्र काही हुक्का पार्लर चालक उच्च न्यायालयात गेले आणि त्यांनी हर्बल हुक्का पार्लरची परवानगी घेतली. मात्र हर्बल हुक्का पार्लरच्या नावाखाली ड्रग्ज अमली पदार्थांची विक्री होते हे निदर्शनास आले आहे. त्यानंतर कठोर कारवाई करत ५० जणांवर गुन्हे दाखल केले असून सव्वा कोटींचा मुद्देमाल जप्त केल्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी सांगितले.