महाराष्ट्रातली जनता शहाणी आहे. महाराष्ट्र वेगळा विचार करू शकतो, हे आपण दाखवून दिले आहे. महाराष्ट्र सध्या शांत आहे; पण ज्यावेळी तो पेटतो, ज्याच्यासाठी तो पेटतो त्याला जाळून खाक करून टाकतो. इथे सत्तेचा माज चालत नाही, असे शरसंधान मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर साधले. राज्यसभा निवडणुकीत शिवसेना व सहयोगी पक्ष तथा अपक्ष आमदारांचे एकही मत फुटले नाही. या निवडणुकीत कलाकारी कोणी केली, हे आपल्याला माहिती आहे, असे सूचक वक्तव्यही त्यांनी केले. विधानपरिषद निवडणूक जिंकणारच, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
शिवसेनेचा ५६ वा वर्धापनदिन रविवारी साजरा करण्यात आला. त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलत होते. शिवसेना नेते आदित्य ठाकरे, संजय राऊत, सुभाष देसाई, दिवाकर रावते यांच्यासह शिवसेनेचे सर्व आमदारही यावेळी उपस्थित होते. ठाकरे म्हणाले, ‘‘राज्यसभा निवडणुकीत जे झाले, ते आता होणार नाही. शिवसेनेचे एकही मत फुटलेले नाही. या निवडणुकीत कलाकारी कोणी केली, हे आपल्याला माहिती आहे, असा सूचक इशारा देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, ‘‘शिवसेनेने फाटाफुटीचे राजकारण भोगले आहे; पण त्यानंतरही शिवसेना भक्कमपणे उभी राहिली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे त्यावेळी म्हणाले होते, ‘मला आईचे दूध विकणारा नराधम माझ्या शिवसेनेत नको. आज शिवसेनेत गद्दार मनाचा कोणी राहिलेला नाही. उद्या होणारी विधानपरिषदेची निवडणूक आपण नक्कीच जिंकू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
आमशा पाडवी हे विधानसभेला केवळ १३०० मतांनी पडले होते. नंदूरबारच्या दुर्गम आदिवासी भागात ते कार्य करतात. त्या आदिवासी बांधवांचा आवाज सभागृहापर्यंत पोहोचला पाहिजे. सचिन अहिर देखील गेली दोन वर्षे चांगले काम करत आहेत. कामगारक्षेत्रात त्यांचे मोठे कार्य आहे. विधिमंडळातील त्यांच्या अनुभवाचा पक्षाला फायदा होईल, असेही ठाकरे म्हणाले.
मग राज्यकर्तेही भाडोत्रीच आणा
उ्दधव ठाकरे यांनी केंद्राच्या अग्निपथ योजनेवर जोरदार टीका केली. ‘‘सैन्यभरतीसाठी अग्निपथ ही योजना केंद्राने आणली आहे. १७ ते २१ वर्षांपर्यंत सैन्यात नोकरी केल्यानंतर त्या तरूणाला पुढच्या आयुष्यात नोकरीची हमी काय? आता सैनिक पण भाडोत्रीच भरायचे का? मग राज्यकर्ते पण भाडोत्रीच घ्या. मुख्यमंत्रीपद, पंतप्रधानपदासाठीही टेंडरच काढा ना. असे निर्णय होणार असतील तर तरूणाई भडकणार नाही तर काय होणार,’’ असा सवालही उद्धव ठाकरे यांनी केला. शेतकरी आंदोलनामुळे या सरकारला दोन पावले मागे जावे लागले. आता हे नवीन टुमणे काढले, असे ते म्हणाले.