मुंबई : मुंबई उच्च न्यालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने मंगळवारी कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील तीन आरोपींना जामीन मंजूर केला. पोलिसांनी या बहुचर्चित प्रकरणात एकूण १२ आरोपींना अटक केली होती. पैकी ९ आरोपींना यापूर्वीच जामीन मंजूर करण्यात आला आहे. आता उर्वरित तिन्ही आरोपींना जामीन मंजूर करण्यात आला आहे. यामध्ये मुख्य आरोपी वीरेंद्रसिंह तावडे याचाही समावेश आहे.
हायकोर्टाच्या कोल्हापूर खंडपीठाचे न्यायमूर्ती एस. जी. डिगे यांनी तावडेबरोबरच शरद कळसकर आणि अमोल काळे यांना जामीन मंजूर केला.
तावडे आणि काळे तुरुंगातून बाहेर पडतील व कळस्कर हा तुरुंगातच राहील, कारण त्याला नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणात दोषी ठरवले गेले आहे. दोषारोपाविरुद्ध त्याचे अपील हायकोर्टात प्रलंबित आहे.
न्यायमूर्ती डिगे यांनी मंगळवारी सांगितले की, त्यांनी तीनही आरोपींना जामीन मंजूर केला असून नंतर ते तपशीलवार आदेश पारित करतील. पानसरे कुटुंबाच्या वकिलाच्या विनंतीवर खंडपीठाने आपल्या आदेशावर स्थगिती नाकारली.
पानसरे यांच्यावर १६ फेब्रुवारी २०१५ रोजी कोल्हापूरमध्ये गोळीबार झाला होता. २० फेब्रुवारी रोजी त्यांचे निधन झाले.
या प्रकरणाची सुनावणी पूर्ण होणार नसल्याच्या कारणास्तव यापूर्वी सचिन अंदूरे, गणेश मिस्किन, अमित डेगवेकर, अमित बड्डी, भरत कुरणे आणि वासुदेव सूर्यवंशी यांना जामीन मंजूर झाला होता.