आदित्य ठाकरे,मिलिंद देवरा,संदीप देशपांडे (डावीकडून) 
मुंबई

वरळी मतदारसंघात तिरंगी लढत; आदित्य ठाकरेंसमोर शिंदे सेना आणि मनसेचे आव्हान

Maharashtra assembly elections 2024 : मुंबई शहर जिल्ह्यात वरळी विधानसभा मतदारसंघ येतो. या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व काँग्रेस, कम्युनिस्ट पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस या प्रमुख राजकीय पक्षांच्या नेत्यांसोबत अपक्ष उमेदवारानेही केले आहे.

Swapnil S

तेजस वाघमारे / मुंबई

मुंबई शहर जिल्ह्यात वरळी विधानसभा मतदारसंघ येतो. या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व काँग्रेस, कम्युनिस्ट पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस या प्रमुख राजकीय पक्षांच्या नेत्यांसोबत अपक्ष उमेदवारानेही केले आहे. काँग्रेसचे वर्चस्व राहिलेला हा मतदारसंघ काळाच्या ओघात आता शिवसेनेच्या ताब्यात आला. शिवसेनेचा गड राहिलेल्या या मतदारसंघातून आदित्य ठाकरे दुसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यांच्यासमोर शिवसेना शिंदे गटाचे खासदार मिलिंद देवरा आणि मनसेचे संदीप देशपांडे यांचे आव्हान आहे. त्यामुळे या मतदारसंघात तिरंगी लढत होणार आहे.

वर्ष १९६२ ते १९७२ या कालावधीत झालेल्या तीन विधानसभा निवडणुकीत वरळी मतदारसंघातून काँग्रेस उमेदवारांनी विजय मिळवला होता. त्यानंतर झालेल्या १९७८ च्या निवडणुकीत कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे प्रल्हाद कुरणे यांनी विजय मिळवला. १९८० च्या निवडणुकीत पुन्हा काँग्रेसने या मतदारसंघावर आपला झेंडा फडकवला. १९८५ च्या निवडणुकीत विनिता दत्ता सामंत यांनी अपक्ष निवडणूक लढवत विजय मिळवला होता. यानंतर सलग चार निवडणुकीत शिवसेनेचे दत्ता नलावडे यांनी या मतदारसंघावर भगवा झेंडा फडकवला. १९९९ आणि २००४ च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने दुसऱ्या क्रमांकाची मते घेत शिवसेनेला आव्हान दिले होते. याच बळावर २००९ च्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या सचिन अहिर यांनी बाजी मारली. २०१४ च्या निवडणुकीत सचिन अहिर यांचा पराभव करत शिवसेनेचे सुनील शिंदे विधानसभेत गेले. २०१९ ला शिवसेनेने या मतदारसंघातून आदित्य ठाकरे यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवले. विरोधात तुल्यबळ उमेदवार नसल्याने ठाकरे यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला.

२०१९ च्या निवडणुकीत वरळी मतदारसंघातून आदित्य ठाकरे यांनी ६७ हजार ४२७ इतक्या मोठ्या मताधिक्याने सरशी साधली होती. त्यांना ८९ हजार २४८ मते मिळाली होती. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे सुरेश माने यांना २१ हजार ८२१ मते मिळाली होती. वंचित बहुजन आघाडीचे गौतम गायकवाड यांना ६ हजार ५७२ मते मिळाली होती.

२०१४ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजप युती तुटल्याने शिवसेना आणि भाजपने एकमेकांविरोधात उमेदवार उभे केले. यामध्ये शिवसेनेचे सुनील शिंदे यांनी ६० हजार ६२५ मते घेत विजय मिळवला होता. राष्ट्रवादीचे सचिन अहिर यांना ३७ हजार ६१३ मते मिळाली होती. भाजपचे सुनील राणे यांना ३० हजार ८४९ मते मिळाली होती. मनसेचे विजय कुडतरकर यांना ८ हजार ४२३ मते मिळाली होती. तसेच काँग्रेसनेही येथून दत्तात्रय नौघाणे यांना उमेदवारी दिली होती. त्यांना ५ हजार ९४१ मते मिळाली होती.

यंदाच्या निवडणुकीत या मतदारसंघातून महायुतीकडून खासदार मिलिंद देवरा निवडणूक लढवत आहेत. तर मविआकडून आदित्य ठाकरे मैदानात आहेत. मनसेनेचे संदीप देशपांडे मैदानात आहेत. येथे मराठी, गुजराती, मुस्लिम, ख्रिचन समाजाचे मतदात आहेत. शिवसेना शिंदे गट, शिवसेना ठाकरे गट आणि मनसेच्या उमेदवारांमध्ये मराठी मतांचे विभाजन होणार असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. मराठी मतांचे विभाजन झाल्यास या मतदारसंघात ठाकरेंना धक्का बसू शकतो, असा अंदाज वर्तवला जात आहे. लोकसभा निवडणुकीत वरळी विधानसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार खासदार अरविंद सावंत यांना ६४ हजार ८४४ मते मिळाली. तर शिवसेना शिंदे गटाच्या यामिनी जाधव यांना ५८ हजार १२९ मते मिळाली. सावंत यांना ६ हजार ७१५ मतांची आघाडी मिळाली आहे. त्यामुळे आदित्य ठाकरे यांच्यासाठी ही लढाई जड असल्याचे बोलले जाते. मनसेने यंदा येथून उमेदवार दिल्याने आदित्य ठाकरे यांचे टेन्शन वाढले असल्याचे बोलले जाते.

समस्या

वरळी कोळीवाड्याचा विकास

रखडलेल्या झोपडपट्टी पुनर्विकास योजना 

वाहतूककोंडी

बीडीडी चाळींचा पुनर्विकास

एकूण मतदार - २,६३,६९७

पुरुष - १,४४,१६२

महिला - १,१९,५२९

तृतीयपंथी - ६ 

‘एक है, तो सेफ है’ हे वोट जिहादला प्रत्युत्तर; देवेंद्र फडणवीस यांनी केले योगी, मोदींच्या घोषणांचे समर्थन

महायुतीनेच घेतला ‘बटेंगे’चा धसका; पंकजा मुंडे, अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली नापसंती

१८ ते २० नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षण सचिवांकडून सर्व शाळांना विनंतीपत्र

मतदानाच्या दिवशी मेट्रो, बस उशिरापर्यंत धावणार! BMC आयुक्त भूषण गगराणी यांचे निर्देश

मालिका विजयासाठी आज विजय अनिवार्य!जोहान्सबर्ग येथे भारताचा दक्षिण आफ्रिकेशी निर्णायक चौथा टी-२० सामना