मुंबई : ऑनलाईन फसवणुकीच्या गुन्ह्यांतील दोन आरोपींना व्ही. पी. रोड पोलिसांनी अटक केली. राहुल शौकत खान आणि जफरुद्दीन इब्रा खान अशी या दोघांची नावे आहेत. अटकेनंतर या दोघांनाही लोकल कोर्टाने शुक्रवार ७ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. गिरगावात राहणाऱ्या तक्रारदाराच्या मोबाईलवर अज्ञात व्यक्तीने संपर्क क्यूआर कोड पाठविण्यास प्रवृत्त केले होते. या क्यूआरच्या मदतीने त्यांनी त्यांच्याकडून ८८ हजार रुपये गुगल पेद्वारे काढून त्यांची फसवणूक केली होती. हा प्रकार उघडकीस येताच त्यांनी व्ही. पी रोड पोलिसांत तक्रार केली होती. तपासात फसवणुकीची रक्कम राहुल खान याच्या खात्यात जमा झाली होती. राहुल आणि जफरुद्दीन यांना राजस्थानहून अटक करण्यात आली. त्यांच्याकडून पोलिसांनी ७० हजार ३४२ रुपयांची कॅश जप्त केली आहे. या दोघांकडून पोलिसांनी वेगवेगळ्या बँकेचे पंधराहून अधिक डेबीट कार्ड, कंपनीचे चार मोबाईल, सिमकार्ड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.