मुंबई

रिक्षा-टॅक्सी मीटर रिकॅलिब्रेशनसाठी दोन महिन्यांची मुदतवाढ

देवांग भागवत

भाडेवाढीनंतर रिक्षा-टॅक्सी मीटर रिकॅलिब्रेशनचे (मीटर बदल) आणि त्यानंतर मीटर प्रमाणित करण्याचे काम सध्या मुंबईत सुरू आहे. मीटर प्रमाणित करण्याचे काम मुंबई रिक्षामेन्स युनियनकडे सोपविण्यात आले आहे. मात्र अद्याप या रिकॅलिब्रेशन प्रक्रियेसाठी आणखी कालावधी लागणार असल्याने रिक्षा-टॅक्सी मीटर प्रमाणीकरणाला दोन महिन्यांची मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव प्रादेशिक परिवहन कार्यालयाने तयार केला आहे. त्यामुळे प्रवाशांना रिक्षा-टॅक्सी चालकांच्या मागणीनुसार भाडे द्यावे लागणार अशी शक्यता निर्माण झाली आहे.

१ ऑक्टोबरपासून रिक्षा-टॅक्सीच्या किमान भाडेदरात २ आणि ३ रुपये आणि कूल कॅबच्या दरात ७ रुपये भाडेवाढ घोषित करण्यात आली आहे. या नवीन दराप्रमाणे भाडे आकारण्यासाठी रिक्षा-टॅक्सी मीटरचे प्रमाणीकरण करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. रिक्षा-टॅक्सी चालकांनी मीटरचे प्रमाणीकरण केलेले नाही. यामुळे सुधारित दर मीटरमध्ये दिसत नाहीत. जून्या दराप्रमाणे मीटरमध्ये रुपये दाखवण्यात येतात. रिक्षा-टॅक्सी चालकांकडून वाढीव दराने रुपयांची मागणी होते. यामुळे चालक आणि प्रवासी यांच्यात वाद उद्भवतात. दरम्यान, यामुळे मीटर रिकॅलिब्रेशनचे काम सुरु असून हे काम अतिशय किचकट असल्याने यासाठी आणखी काही कालावधी लागणार आहे. त्यानुसार नुकतेच मीटर प्रमाणीकरणाला दोन महिन्यांची मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आलेला आहे. हा प्रस्ताव मान्यतेसाठी परिवहन सचिवांकडे पाठवण्यात आला आहे. लवकरच यावर निर्णय घेण्यात येणार असल्याचे परिवहन अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.

३४ टक्के प्रमाणीकरण पूर्ण

मुंबई शहरातील आरटीओंमध्ये १० हजार ७३९ काळी-पिवळी टॅक्सी आणि १ लाख ३२ हजार २८२ रिक्षा नोंदणीकृत आहेत. मुंबई महानगर प्रदेशात टॅक्सीची संख्या ५२ हजार ७४९ आणि रिक्षांची संख्या ७ लाख ५४ हजार ६७० इतकी आहे. शहर-उपनगरांतील रिक्षा-टॅक्सींपैकी अवघ्या ३४ टक्के गाड्यांनी मीटरचे प्रमाणीकरण पूर्ण केले आहे.

'मंगलपर्व' आजपासून, मुंबईसह देशात गणेशोत्सवाचा जल्लोष

उद्या हार्बर, ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही; मुख्य मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

'लाडकी बहीण' योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकाच स्वीकारणार

Traffic Update: मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांचे हाल सुरूच; गणेश भक्तांची १२ तास रखडपट्टी

निवडणुकीनंतरच महायुतीचा मुख्यमंत्री ठरेल - फडणवीस