मुंबई

निमित्त मावशीचे, बोलणी युतीची! उद्धव ठाकरे शिवतीर्थावर राज ठाकरेंच्या भेटीला; संभाव्य युतीसाठी दोन ते तीन तास ठाकरे बंधूंमध्ये खलबते

मुंबई महापालिकेची निवडणूक कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची चिन्हे दिसत असतानाच, सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी करायला सुरुवात केली आहे. उद्‌धव ठाकरे यांनी बुधवारी शिवतीर्थावर जाऊन राज ठाकरे यांची भेट घेतली. कुंदा मावशीच्या भेटीसाठी उद्धव ठाकरे शिवतीर्थावर गेले, असे कारण खासदार संजय राऊत यांनी दिले असले तरी उद्धव-राज या ठाकरे बंधूंमध्ये जवळपास तीन तास चर्चा झाली.

Swapnil S

मुंबई : मुंबई महापालिकेची निवडणूक कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची चिन्हे दिसत असतानाच, सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी करायला सुरुवात केली आहे. शिवसेना ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्‌धव ठाकरे यांनी बुधवारी शिवतीर्थावर जाऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. कुंदा मावशीच्या भेटीसाठी उद्धव ठाकरे शिवतीर्थावर गेले, असे कारण खासदार संजय राऊत यांनी दिले असले तरी उद्धव-राज या ठाकरे बंधूंमध्ये जवळपास तीन तास चर्चा झाली. संजय राऊत आणि आमदार अनिल परब यांच्या उपस्थितीत नेमक्या कोणत्या मुद्द्यावर चर्चा झाली, याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली असली तरी ‘निमित्त मावशीच्या भेटीचे, पण चर्चा युतीची’ रंगली, असे बोलले जाते.

उद्धव-राज या ठाकरे बंधूंमध्ये गेल्या काही दिवसांपासून भेटीगाठी वाढत चालल्या असून गेल्या दोन महिन्यांतील ही चौथी भेट होती. याआधी उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरे मातोश्रीवर आले होते. त्यानंतर गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी उद्धव ठाकरे दादर येथील शिवतीर्थावर पोहोचले होते. त्यातच पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांनी बुधवारी शिवतीर्थ गाठत राज ठाकरे यांची भेट घेतली. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोघांमध्ये जवळपास दोन ते तीन तास चर्चा झाल्याने आगामी निवडणुकीपूर्वी राजकीय घडामोडींना वेग आला आहे. यावेळी उद्धव ठाकरे यांच्या बरोबर खासदार संजय राऊत आणि आमदार अनिल परबही उपस्थित होते. विशेष म्हणजे, उद्धव ठाकरे यांच्यासोबतची बोलणी झाल्यानंतर राज ठाकरे यांनी मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली. त्यामुळे शिवतीर्थावर संभाव्य युतीबाबत खलबते झाली, अशीच चर्चा राजकीय वर्तुळात रंगली असून युतीची घोषणा कधी होणार, याकडे राजकीय नेत्यांसह सर्वसामान्य जनतेचे लक्ष लागले आहे.

आगामी निवडणुकीपूर्वी मनसे शिवसेना युतीची शक्यता वर्तवली जात असून दसरा मेळाव्याला याबाबत अधिकृत घोषणा होईल, असे बोलले जाते. दरम्यान, मनसे आणि ठाकरेंची शिवसेना एकत्र आली तर महाविकास आघाडीत बिघाड होणार, अशी चर्चा रंगू लागली आहे. त्यामुळे राज्यात काही दिवसांतच राजकीय भूकंप होण्याची चर्चा रंगली आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव बुधवारी दुपारी १२ वाजता शिवतीर्थवर पोहोचले. त्यानंतर ठाकरे बंधूंमध्ये चर्चा झाली. जवळपास दोन ते तीन तास चर्चा झाल्याने महायुतीसह मविआतील घटक पक्षांच्या भुवया उंचावल्या आहेत.

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे दोन महिन्यांपासून चार वेळा भेटले आहेत. त्यांची पहिली भेट शाळेतील हिंदी भाषेची सक्ती आणि मराठीचा मुद्दा यावर झाली. त्यानंतर तीन वेळा ते भेटले. त्यांच्या प्रत्येक भेटीची आणि जवळकीची राजकारणात प्रचंड चर्चा सुरू आहे. अशातच ठाकरे गट आणि मनसे यांच्यातील युतीची घोषणा ठाकरेंच्या दसरा मेळाव्यात होऊ शकते, अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे.

आघाडीत बिघाडीची शक्यता

मराठीच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे जवळपास दोन दशकांनी एकाच मंचावर आल्यानंतर राजकीय क्षितीजावरही हे दोन दिग्गज नेते एकत्र येतील का, याविषयीची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. त्यातच आता मनसे-शिवसेना युती कधी होणार, याबाबतची चर्चा तीव्र झाली आहे. राज-उद्धव यांच्यातील युतीची घोषणा झाली तर महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची दाट शक्यता आहे.

मावशीला भेटायला आले - संजय राऊत

गणपतीत उद्धव ठाकरे शिवतीर्थावर आले होते. त्यावेळी राज ठाकरे यांच्या मातोश्रींबरोबर नीट बोलता आले नव्हते. त्यामुळे राज ठाकरे यांच्या मातोश्री कुंदा ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना निवांत भेटायला ये, असे आमंत्रण दिले होते. त्यामुळे उद्धव ठाकरे बुधवारी राज ठाकरे यांच्या घरी भेटायला आले होते. या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नसून कौटुंबिक भेट असल्याचे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले.

नेपाळमध्ये अडकले ४४ नाशिककर पर्यटक; कळवण तालुक्यातील ४० तर नाशिकमधील ४ जण संकटात!

Asia Cup 2025 : भारत-पाकिस्तान मॅच रद्द करण्यास SC चा नकार, याचिकेवर तातडीने सुनावणीची मागणी फेटाळली

राज्यभरात पुढील ४ दिवस पावसाचे; अरबी समुद्रात पुन्हा कमी दाबाचा पट्टा

डीजी प्रवेश ॲप कार्ड लंपास; मंत्रालयातील धक्कादायक प्रकार उघडकीस

गॅस गळतीच्या घटनांची दखल; सुमोटो याचिका दाखल; राज्य सरकारला नोटीस