राज्यातील मतदार याद्यांमधील गैरव्यवहार, बोगस आणि दुबार नावे, तसेच निवडणूक आयोगाच्या बेजबाबदार कारभाराविरोधात सर्वच विरोधी पक्ष एकत्र आले आहेत. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे), काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष), शेकाप आणि इतर विरोधी पक्षांच्या नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक यशवंतराव चव्हाण सेंटर येथे आज पार पडली. या बैठकीत आगामी १ नोव्हेंबर रोजी काढण्यात येणाऱ्या मोर्च्याबाबत सविस्तर चर्चा झाली. बैठकीला उद्धव ठाकरे, राज ठाकरे, काँग्रेस नेते, राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते आणि शेकापचे जयंत पाटील उपस्थित होते. बैठकीनंतर अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेऊन मोर्च्याबाबत माहिती दिली.
शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी सांगितले, "निवडणूक आयोगाच्या बेजबाबदार कारभारांमधला घोळ, मतचोरी, याद्यांमधला गैरव्यवहार या सगळ्यांच्या बाबतीत लोकांना सत्य कळावं, असत्य जनतेसमोर जावं यासाठी विरोधीपक्षाने सत्याचा मोर्चा काढण्याचे ठरवले. महाविकास आघाडीचे सर्व पक्ष, मनसे आणि जे जे या सगळ्या गोष्टींच्या विरोधात आहेत ते सगळे मतदार या मोर्च्यात सामील होतील."
परब यांनी पुढे सांगितले की, ''हा मोर्चा दुपारी १ वाजता फॅशन स्ट्रीटवरून सुरू होईल आणि मेट्रो सिनेमा मार्गे मुंबई महापालिकेच्या प्रवेश द्वाराजवळ थांबेल. या मोर्च्यात महाविकास आघाडीतील सर्व नेते, मनसे प्रमुख राज ठाकरे, डाव्या पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित राहतील आणि मार्गदर्शन करतील. या मोर्च्याला लाखोंच्या संख्येने लोक सहभागी होतील, अशी अपेक्षा आहे. शांततेत हा मोर्चा पार पडेल आणि पुढील दिशा त्याच ठिकाणी ठरवली जाईल.”
परब यांनी स्पष्ट केले की, “ज्यांना वाटतंय की त्यांचं मत चोरीला गेलं आहे, चुकीचं सरकार बसलं आहे. त्यांनी या मोर्च्यात सामील व्हावं.”
मोर्च्यानंतर पुढील दिशा ठरणार
विरोधकांच्या या मोर्च्यानंतर निवडणूक आयोगाविरोधातील भूमिका आणखी कठोर होणार आहे. महाविकास आघाडी आणि मनसेच्या या एकत्र येण्यामुळे राज्यातील राजकीय समीकरणांमध्येही नवीन घडामोडी दिसण्याची चिन्हे आहेत.