मुंबई : देशात सुरू झालेला संघर्ष हा कोणत्याही निवडणुकीसाठी नसून ‘भाजप’विरोधात ‘भारत’ असा आहे अशा शब्दांत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्रातील मोदी सरकारवर हल्ला चढवला.
केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाला यश आल्यानंतर रविवारी शिवाजी पार्क परिसरात शिवसेना (उबाठा) आणि मनसेच्या वतीने ‘विजयी जल्लोषा’चे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. हाती तिरंगा घेऊन तरुणाई मोठ्या संख्येने या विजयी जल्लोषात सामील झाली होती.
मेळाव्यातील गर्दी ही निवडणूक झाल्यानंतरची नाही तर अंधभक्तांविरोधात देशभक्त जिंकल्यानंतरची आहे, असे नमूद करून ठाकरे यांनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पक्षफोडीपेक्षा देशाकडे लक्ष द्यावे, असा टोला लगावला.
‘एका झुरळाने हुकूमशहाला नमवले. हाच खरा विष्णूचा अवतार आहे’, अशा शब्दांत तरुणांनी दिलेल्या लढ्याचे कौतुक करून ठाकरे म्हणाले की, ही ठिणगी आता जागती ठेवणे आपल्या सगळ्यांचे काम आहे. देशातील तरुणाईने देशाच्या इतिहासातील सुवर्णपान लिहिले आहे. आता आलेली जाग जाऊ देऊ नका, सत्ताधाऱ्यांची मस्ती सहन करू नका, हा संघर्ष आता सुरू झाला आहे.
काहीजण विचारतात, निवडणुकीला अजून तीन वर्षे आहेत. निवडणुका गेल्या खड्ड्यात, मोदींना मते चोरता येतील, पण माणसे चोरता येणार नाहीत. हा लढा निवडणुकीसाठी नाही, तर देशाच्या भविष्यासाठी आहे, असेही उद्धव म्हणाले.
यावेळी राज ठाकरे यांनी तरुणांच्या आंदोलनाला मिळालेल्या यशाबद्दल त्यांचे अभिनंदन केले. या देशातील झेन झी सरकारच्या झिंज्या कशा उपटते हे या आंदोलनातून कळले, असे सांगताना त्यांनी नीट परीक्षेचा पेपर फुटल्यामुळे आत्महत्या करणाऱ्या २१ विद्यार्थ्यांची यादी वाचून दाखवली. तसेच यावेळी त्यांनी मुंबई पोलिसांचे आभार मानले.
मंत्र्यांना सांगा, आपापले काम करा !
भाजप सरकारमधील मंत्री पक्ष फोडण्यात दंग आहेत. त्यांना आता तरी देशाचे काम करायला सांगा. अर्थमंत्री निर्मला सीतारामन घसरत्या रुपयाबद्दल किंवा महागाईबद्दल बोलत नाहीत, मात्र पेपरफुटीचे फायदे समजावून सांगतात. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह देशाच्या संरक्षणापेक्षा धर्मेंद्र प्रधान यांच्या संरक्षणासाठी पुढे येतात. आमचे रस्ते मंत्री रस्त्यांवरील खड्ड्यांऐवजी इथेनॉलच्या विषयावर बोलत आहेत, अशी टोलेबाजी उद्धव ठाकरे यांनी यावेळी केली.