Mumbai : केंद्राची भूमिका दडपशाहीची; उद्धव ठाकरेंची टीका, सोनम वांगचुक समर्थनार्थ जोरदार आंदोलन (Photo-X/@ShivSenaUBT_)
मुंबई

Mumbai : केंद्राची भूमिका दडपशाहीची; उद्धव ठाकरेंची टीका, सोनम वांगचुक समर्थनार्थ जोरदार आंदोलन

कॉकरोच जनता पार्टी आणि सोनम वांगचुक यांच्याशी संवाद साधण्याऐवजी केंद्र सरकार दडपशाही करत आहे अशी टीका शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी रविवारी केली.

Swapnil S

मुंबई: कॉकरोच जनता पार्टी आणि सोनम वांगचुक यांच्याशी संवाद साधण्याऐवजी केंद्र सरकार दडपशाही करत आहे अशी टीका शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी रविवारी केली. मुंबईत दादरमध्ये सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ आयोजित आंदोलनात ते बोलत होते.

रोजगार, शिक्षण न देणारे केंद्रातील हे सरकार बदललेच पाहिजे. तुम्ही आता केवळ कार्यकर्ते न राहता नेते व्हा. तुमच्या मनात पेटलेली आग कायम धगधगती राहूद्या व त्यात या हुकुमशाही सरकारचे भस्म होऊ द्या अशा शब्दांत शिवसेना (उबाठा गट) प्रमुख उद्धव ठाकरेंनी भाजप सरकारला लक्ष्य केले. नीट पेपर फुटीप्रकरणी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झालाच पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.

‘सोनम वांगचुक यांनी देशाला काय दिले आणि या सरकारने देशाला काय दिले, याचा हिशेब होऊन जाऊ दे असे आव्हान ठाकरे यांनी यावेळी दिले. बर्फात, कडाक्याच्या थंडीत देशांच्या सीमांचे रक्षण करणाऱ्या आपल्या सैनिकांसाठी वांगचुक यांनी सोलर कॅम्प उभारले. लडाखमध्ये पाण्याचे दुर्भिक्ष्य असल्याने कृत्रिम आईस माउंटन तयार केला. त्याच सोनम यांना केंद्र सरकार देशद्रोही ठरवतेय,’ अशा शब्दांत ठाकरेंनी मोदी सरकारवर टीका केली.

यावेळी त्यांनी १५ वर्षांपूर्वी झालेल्या अण्णा हजारेंच्या आंदोलनाची आठवण करून दिली. अण्णा हजारे उपोषणाला बसलेले असताना त्यांच्या आंदोलनाला देशभरात प्रसिद्धी मिळाली. त्यावेळी कोणीही त्यांना देशद्रोही किंवा चीनचा हस्तक म्हटले नव्हते.

त्यावेळी सत्तेत असलेल्या पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी अण्णांशी चर्चा करायला विलासराव देशमुखांना पाठवले होते. पण आता सत्तेत असलेल्या सरकारकडून संवाद साधण्याऐवजी दडपशाही सुरू असल्याची टीका त्यांनी केली.

‘पाकशी चर्चा, आंदोलकांची गळचेपी’

यावेळी ठाकरेंनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, वरिष्ठ नेते दत्तात्रय होसबळे यांच्या विधानांचा संदर्भ दिला. पाकिस्तान सोबत भारताने चर्चा करायला हवी, असे विधान होसबळे यांनी केले होते. त्याला भागवत यांनीदेखील सहमती दर्शवली होती. जे लोक आमच्या सैनिकांच्या आयुष्यावर उठलेत, त्यांच्यासोबत चर्चा करण्याची यांची तयारी आहे. पण ज्या व्यक्तीने आपल्या सैनिकांची सेवा केली. लष्करासाठी योगदान दिले. त्यांच्याशी मात्र हे सरकार चर्चा करण्यास तयार नाही, अशा शब्दांत ठाकरेंनी संघासह भाजपवर तोफ डागली. आज जे देशात सुरू आहे, तेच संघाच्या कल्पनेतील हिंदू राष्ट्र आहे का, असा सवाल त्यांनी मोहन भागवत यांना विचारला.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai : मंत्रालयातील दूषित पाणीप्रश्नी समिती गठित; मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांचे निर्देश

Mumbai : अनधिकृत बांधकामांवर आता AI ची नजर; तिवाना यांची ठरावाची सूचना सभागृहात मंजूर

Thane : शाळांसमोर पानटपऱ्या, अमली पदार्थांची विक्री; विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ सुरू, महासभेत नगरसेवकांचा संताप

Mumbai : पालिका सभागृहात आरोग्य सुविधांवर भर; महापौर वैद्यकीय निधी कक्ष सुरू होणार

Mumbai : बनावट जन्मदाखल्याचा फटका सर्वसामान्यांना; विदेशी शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांची कोंडी, सभागृहात प्रशासनावर सर्वपक्षीय टीका