Mumbai : वीर सावरकर उड्डाणपूल मोनोपाईलवर उभा राहणार! IIT मुंबईचा अहवाल संग्रहित छायाचित्र
मुंबई

Mumbai : वीर सावरकर उड्डाणपूल मोनोपाईलवर उभा राहणार! IIT मुंबईचा अहवाल

गोरेगावातील वीर सावरकर उड्डाणपुलाच्या भवितव्याबाबत मोठा दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला आहे. आयआयटी मुंबईने अहवाल सादर केला असून मोनोपाईल (एकल स्तंभ) तंत्रज्ञानाच्या वापराने उड्डाणपुलाची पुनर्बांधणी करणे योग्य असल्याचे अहवालात नमूद केले आहे. त्यामुळे वीर सावरकर उड्डाणपूल पाडण्याचा प्रस्ताव अखेर रद्द करण्यात आला आहे.

Swapnil S

मुंबई : गोरेगावातील वीर सावरकर उड्डाणपुलाच्या भवितव्याबाबत मोठा दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला आहे. आयआयटी मुंबईने अहवाल सादर केला असून मोनोपाईल (एकल स्तंभ) तंत्रज्ञानाच्या वापराने उड्डाणपुलाची पुनर्बांधणी करणे योग्य असल्याचे अहवालात नमूद केले आहे. त्यामुळे वीर सावरकर उड्डाणपूल पाडण्याचा प्रस्ताव अखेर रद्द करण्यात आला आहे.

वीर सावरकर उड्डाणपूल, जो एमटीएनएल उड्डाणपूल म्हणूनही ओळखला जातो, रेडिसन हॉटेल ते रुस्तमजी ओझोन परिसरापर्यंत पसरलेला आहे. २०१८ मध्ये उद्घाटन झालेल्या या पुलाच्या बांधकामासाठी सुमारे २७ कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला होता. मात्र वर्सोवा–दहिसर कोस्टल रोड, माइंडस्पेस–दिंडोशी तसेच गोरेगाव–मुलुंड लिंक रोड या महत्त्वाच्या जोडमार्गांसाठी हा उड्डाणपूल पाडण्याचा निर्णय पूर्वी घेण्यात आला होता.

रहिवाशांचा विरोध

कोस्टल रोड कनेक्टरसाठी आवश्यक जागा व तांत्रिक अडचणींमुळे पुलाशिवाय पर्याय नसल्याची भूमिका महापालिकेने घेतली होती. मात्र स्थानिक नागरिक व लोकप्रतिनिधींनी या निर्णयाला विरोध दर्शवला. त्यानंतर पालिकेने पर्यायी उपाय म्हणून या तंत्रज्ञानाचा पर्याय पुढे आणला.

नव्या आराखड्यांना आयआयटीची मान्यता

डिसेंबर महिन्यात आयआयटी मुंबईच्या तज्ज्ञ समितीने उड्डाणपुलाची प्रत्यक्ष पाहणी करत त्याची रचना, उंची, वळणक्षमता (टर्निंग रेडियस) आणि लांबीतील बदल शक्य आहेत का, याचा सखोल अभ्यास केला. समितीने काही रचनात्मक सुधारणा सुचवून सुधारित आराखडे सादर करण्यास सांगितले होते. त्यानुसार कंत्राटदाराने सादर केलेल्या नव्या आराखड्यांना आता आयआयटी मुंबईची मान्यता मिळाली आहे.

अतिरिक्त खर्च

या नव्या आराखड्यानुसार उड्डाणपूल पाडण्याऐवजी मोनोपाईल तंत्रज्ञानाच्या साहाय्याने तो जतन केला जाणार आहे. त्यामुळे गोरेगावकरांना मोठा दिलासा मिळाला असून महापालिकेलाही प्रकल्प पुढे नेण्यासाठी मार्ग मोकळा झाला आहे. या बदलांमुळे होणाऱ्या अतिरिक्त खर्चाचा अंदाज लवकरच तयार केला जाणार आहे.

‘मोनोपाईल’ तंत्रज्ञान

मोनोपाईल हे मजबूत पाया उभारण्याचे आधुनिक तंत्रज्ञान आहे. यामध्ये मोठ्या व्यासाचा प्रबलित काँक्रिटचा एकच खांब जमिनीत किंवा समुद्रात खोलवर रोवला जातो आणि त्यावर संपूर्ण पुलाचा भार असतो. मुंबईच्या दक्षिण भागातील कोस्टल रोड प्रकल्पात याच तंत्रज्ञानाचा यशस्वी वापर करण्यात आला आहे.

काम जलद होण्याची शक्यता

कोस्टल रोड कनेक्टरचे काम दिंडोशीकडून सुरू असून आतापर्यंत २३ खांब उभारण्यात आले आहेत. दिंडोशी न्यायालय परिसरात कामासाठी वेळेची मर्यादा असल्याने तसेच जीएमएलआर कनेक्टरचा काही भाग याच मार्गावरून जाणार असल्यामुळे उर्वरित काम वेगाने पूर्ण होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Mumbai : शीव पूल १५ जुलैपर्यंत वाहतुकीसाठी खुला होणार; अतिरिक्त पालिका आयुक्तांनी केली पाहणी

Budget 2026 : स्वतंत्र भारताचा पहिला अर्थसंकल्प कधी मांडला? उद्या सादर होणारं बजेट कितवं? जाणून घ्या

शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दिलासा; अनुकंपा तत्त्वावरील नियुक्तीसाठी सुधारित योजना

ठाणे शहरात उभारले जाणार १९ ई-व्हेईकल चार्जिंग स्टेशन्स; प्रमुख चौकांमध्ये उपलब्ध होणार सुविधा; पीपीपी तत्त्वावर प्रकल्पाला मंजुरी

Mumbai : ...ती भ्रूणहत्याच ठरेल; न्यायालयाने नाकारली गर्भपाताची परवानगी; खर्च राज्यशासनाने करण्याचे आदेश