X | mybmc
मुंबई

वेसावे ते भाईंदर फक्त २० मिनिटांत; कोस्टल रोड उन्नत मार्गाचे काम होणार सात टप्प्यांत; वेळेत काम पूर्ण करा - अतिरिक्त आयुक्तांचे निर्देश

वेसावे ते भाईंदर उन्नत मार्ग प्रवाशांच्या सेवेत आल्यानंतर १२० मिनिटांचा प्रवास फक्त १५ ते २० मिनिटांत होणार आहे. मुंबई पालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांनी या प्रकल्प कामाची बुधवारी पहाणी केली.

Swapnil S

मुंबई : मुंबई व एमएमआर परिसरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी वेसावे ते भाईंदर उन्नत मार्गाचे काम मुंबई महापालिकेने हाती घेतले आहे. वेसावे ते भाईंदर उन्नत मार्ग प्रवाशांच्या सेवेत आल्यानंतर १२० मिनिटांचा प्रवास फक्त १५ ते २० मिनिटांत होणार आहे. मुंबई पालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांनी या प्रकल्प कामाची बुधवारी पहाणी केली. हा प्रकल्प गुणवत्तापूर्ण व निर्धारित वेळेत पूर्ण करा, असे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. यावेळी प्रमुख अभियंता (रस्ते व वाहतूक) मांतय्या स्वामी, कार्यकारी अभियंता वैभव गांधी, संबंधित अभियंते, सल्लागार आदी उपस्थित होते.

मुंबई महानगरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी तसेच सुसह्य, अखंड प्रवास व्हावा या उद्देशाने मुंबई महानगरपालिकेने मुंबई किनारा रस्ता (उत्तर) हा महत्वाकांक्षी पायाभूत सुविधा प्रकल्प हाती घेतला आहे. संपूर्ण मुंबईचा किनार पट्टा यामुळे एकमेकांना जोडला जाणार आहे. मुंबई किनारा रस्ता (उत्तर) हा मेगा प्रकल्प आंतरबदल व जोडरस्त्यासह सुमारे ६० किलोमीटरचा असून वेसावे - भाईंदर ही नगरे किनारा रस्त्याने जोडली जाणार आहेत.

दोन जुळे बोगदे महत्वपूर्ण...

पॅकेज ‘सी’ मध्‍ये माईंडस्‍पेस मालाड ते चारकोप खाडीदरम्‍यान उत्तर दिशेने जाणाऱ्या ३.९ किलोमीटर लांबीच्या बोगद्याचा आणि पॅकेज ‘डी’ मध्ये चारकोप खाडी ते माईंडस्पेस मालाड दरम्यान दक्षिण दिशेने जाणाऱ्या ३.९ किलोमीटर लांबीच्या जुळ्या बोगद्यांचा समावेश आहे. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी या दोन्ही पॅकेज अंतर्गत येणाऱ्या कामांची प्रत्यक्ष पाहणी केली.

मार्च महिन्यात बोगद्याचे खोदकाम

चारकोप येथे बोगद्याच्या बांधकामासाठी शाफ़्ट उभारण्यात येणार असून त्यासाठी ६५ मीटर × ४० मीटर क्षेत्रफळाच्या जागेवर खोदकाम सुरू करण्यात आले असून पायलिंगचे काम सुरु आहे. बोगदा खणन सयंत्राचे (टीबीएम) सुटे भाग डिसेंबर २०२६ मध्ये उपलब्ध होणार आहेत. त्यानंतर पुढील दोन महिन्यात बोगदा खणन सयंत्राचे सुटे भाग जुळवाजुळव प्रक्रिया पूर्ण करून बोगद्याचे खोदकाम सुरू करणे अपेक्षित आहे. तर, जून महिन्यात दुसऱ्या बोगदा खनन यंत्राची जुळवाजुळव पूर्ण करून दुसऱ्या बोगद्याचे खोदकाम सुरू केले जाईल.

प्रकल्पाच्या उभारणीचे काम सात टप्प्यांत

या प्रकल्पाच्या उभारणीचे काम ए, बी, सी, डी, ई, एफ आणि दहिसर भाईंदर जोड रस्‍ता (डीबीएलआर) अशा एकूण सात टप्प्यांत विभागण्यात आले आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून दुहेरी उन्‍नत मार्ग, खारफुटी क्षेत्रातील खांबांवरील रस्ता, २ केबल आधारीत पूल, ४ बास्केट पूल, सुमारे १५ मीटर व्‍यासाचे २ जुळे बोगदे (ट्वीन टनेल) आणि १० आंतरबदल (इंटरचेंजेस) अशा विविध पायाभूत सुविधा उभारण्यात येणार आहेत.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

नेपाळमध्ये हाहाकार! महापुरात हजारो गेले वाहून, ९५ जणांचा मृत्यू, १३३ भारतीयांसह शेकडो बेपत्ता; नांदेडच्या पर्यटकांचाही समावेश

गरज असेल तरच घराबाहेर पडा; महाराष्ट्रासह २६ राज्यांना १३ तास संकटाचे, हवामान खात्याचा इशारा

बुलेट ट्रेनचा खर्चही सुस्साट! मुंबई-अहमदाबाद प्रकल्पाचा खर्च झाला दुप्पट; १ लाख कोटीवरून २ लाख कोटी

MPSC Paper Leak: तीन अधिकाऱ्यांसह सहा जण अटकेत; अप्पर सचिव अभिजीत लेंडवे, क्लासचालकही ताब्यात

नियम तोडाल तर कारवाई होणारच; मुंढेंचा इशारा; सणासुदीत भेसळयुक्त विक्रेत्यांवर FDA ची नजर, नवी नियमावली आज करणार जारी