सुनील राऊत,सुवर्णा करंजे (डावीकडून)  
मुंबई

विक्रोळीत ठाकरे-शिंदे सेना आमनेसामने; सुनील राऊत यांचे आमदारकीची हॅटट्रिक करण्याचे प्रयत्न 

Maharashtra assembly elections 2024 : विक्रोळी विधानसभा मतदारसंघात गेल्या दोन्ही वेळेस २५ हजारांहून अधिक मतांच्या फरकाने विजयी झालेले एकत्रित शिवसेनेचे सुनील राऊत यावेळी ठाकरे सेनेतर्फे पुन्हा मैदानात उतरून आमदारकीची हॅटट्रिक करण्याच्या शर्थीच्या प्रयत्नात आहेत, तर शिंदे सेनेच्या सुवर्णा करंजे या ठिकाणी आपला झेंडा फडकावण्याच्या प्रयत्नात असल्याने दोन्ही सेना आमनेसामने आल्याचे चित्र आहे.

Swapnil S

शिरीष पवार / मुंबई

विक्रोळी विधानसभा मतदारसंघात गेल्या दोन्ही वेळेस २५ हजारांहून अधिक मतांच्या फरकाने विजयी झालेले एकत्रित शिवसेनेचे सुनील राऊत यावेळी ठाकरे सेनेतर्फे पुन्हा मैदानात उतरून आमदारकीची हॅटट्रिक करण्याच्या शर्थीच्या प्रयत्नात आहेत, तर शिंदे सेनेच्या सुवर्णा करंजे या ठिकाणी आपला झेंडा फडकावण्याच्या प्रयत्नात असल्याने दोन्ही सेना आमनेसामने आल्याचे चित्र आहे. मनसेचे विश्वजित ढोलम हेसुद्धा रिंगणात असून त्यामुळे येथील लढत उत्कंठावर्धक झाली आहे. 

या तीन उमेदवारांबरोबरच बसपचे हर्षवर्धन खांडेकर, वंचित बहुजन आघाडीचे अजय खरात, रिपब्लिकन सेनेचे सुखदेव दांडगे, रासपचे हेमंत पवार, स्वाभिमानी पक्षाचे श्रीकांत शिंदे आदी एकूण १३ उमेदवार निवडणूक लढवित आहेत. मात्र, प्रमुख लढत ही शिवसेना (ठाकरे गट) पक्षाचे सुनील राऊत आणि शिवसेनेच्या (शिंदे गट) सुवर्णा करंजे यांच्यात असल्याचे मानले जात आहे. करंजे या माजी नगरसेविका आहेत. 

२०१९ मध्ये शिवसेना-भाजप युती असताना पुन्हा सुनील राऊत हे शिवसेनेच्या तिकिटावर ६२ हजार ७९४ मते मिळवून विजयी झाले. दुसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या धनंजय पिसाळ यांच्यापेक्षा त्यांना २७ हजार ८४१ मते अधिक मिळाली होती. तर मनसेचे विनोद शिंदे हे १६ हजार ४२ मतांसह तृतीय क्रमांकावर राहिले होते. लोकसभेच्या निवडणुकीत ईशान्य मु्ंबई मतदारसंघातील विक्रोळी क्षेत्रात महाविकास आघाडीचे उमेदवार शिवसेना (ठाकरे गट) पक्षाचे संजय दिना पाटील यांना महायुतीविरोधात १५ हजार ८६५ मतांची आघाडी मिळाली होती.

या विधानसभा निवडणुकीत विक्रोळीत ठाकरे सेनेचे राऊत यांना काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार गट) तसेच अन्य मित्रपक्षांचे सहकार्य कसे मिळते, मूळची शिवसेनेची मते ठाकरे सेना आणि शिंदे सेनेत किती प्रमाणात विभागली जातात, शिंदे सेनेला मित्रपक्षांची कुमक कशी मिळते, मनसेला मतदार कितपत पसंती देतात, अशा अनेक घटकांवर निकालाचे पारडे फिरत राहणार आहे. अस्मिता, स्वाभिमान हे परवलीचे शब्द बनले आहेत. सुनील राऊत यांनी करंजे यांच्याबाबत केलेल्या विधानावरून राऊत यांच्याविरुद्ध निवडणूक आयोगाकडे तक्रारही करण्यात आली आहे. एकूणच येथील लढत ही ठाकरेसेना विरुद्ध शिंदेसेना अशी असल्याने ही जागा आपल्याकडे कायम राखणे हा ठाकरे सेनेच्या प्रतिष्ठेचा प्रश्न बनला आहे.

समस्या

कांजूर येथील डंपिंग ग्राऊंडची दुर्गंधी. 

पुनर्विकास प्रकल्पाच्या कामांमुळे होणारे प्रदुषण 

झोपडपट्टी भागात अपुरा पाणीपुरवठा

सार्वजनिक शौचालयांची कमतरता

एकूण मतदार - २,४३,५३३

पुरुष - १,२७,३३४

महिला - १,१६,१९८

तृतीयपंथी - १ 

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी